वरवरा राव निर्दाेष सुटतील ; तेलंगणातील 26 लेखक, विचारवंतांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 09:17 PM2019-03-19T21:17:14+5:302019-03-19T21:26:39+5:30
माओवादी प्रकरणात अटकेत असलेल्या वरवरा राव यांच्या समर्थनार्थ तेलंगणातून आज 26 लेखक, विचारवंत पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आले हाेते.
पुणे : माओवादी प्रकरणात अटकेत असलेल्या वरवरा राव यांच्या समर्थनार्थ तेलंगणातून आज 26 लेखक, विचारवंत पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आले हाेते. वर वरा राव यांच्या जामीनावर आज सुनावणी हाेणार हाेती. परंतु काही कारणास्तव सुनावणी हाेऊ शकली नाही. वर वरा राव एक विचारवंत, कवी असून ते माओवादी प्रकरणातून निर्दाेष सुटतील असा विश्वास या लेखकांनी यावेळी व्यक्त केला.
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आराेपावरुन विचारवंत वरवरा राव यांना पुणे पाेलिसांनी अटक केली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ते कारागृहात आहेत. आज त्यांच्या जामीनावर सुनावणी हाेणार हाेती. परंतु काही कारणास्तव त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. वरवरा राव यांच्या समर्थनार्थ तेलंगणामधून 26 लेखक, विचारवंत, कलाकार आणि विविध क्षेत्रातील लाेक खासगी बसने पुण्याला आले हाेते. राव यांना पाहता येईल या हेतूने ते पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आले हाेते, परंतु त्यांची निराशा झाली. राव हे निर्दाेष असून यापूर्वीही त्यांना खाेट्या खटल्यांमध्ये अटक करण्यात आली हाेती. त्या खटल्यांमधून त्यांना निर्दाेष साेडण्यात आले हाेते, या खटल्यामधून देखील ते निर्दाेष सुटतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
तेलंगणाच्या एका खासगी मॅगझीनचे संपादक असलेले एन नारायण म्हणाले, आज आम्ही वरवरा राव यांना पाहता येईल या आशेने पुण्याला आलाे हाेताे. परंतु आमची निराशा झाली. त्यांना काही कारणास्तव आज न्यायालयात हजर करण्यात आले नाही. आम्ही तेलंगणामधील 26 कवी, लेखक आणि विविध क्षेत्रातील लाेक असे आलाे हाेताे. राव हे तेलंगणातील प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्यावर खाेटे खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा माओवाद्यांशी कुठलाही संबंध नाही. या आधीही त्यांच्या विराेधात 25 केसेस दाखल करण्यात आल्या हाेत्या. त्यांच्यामधून त्यांची न्यायालयाने निर्दाेष सुटका केली. परंतु या सगळ्यात त्यांना 7 वर्षे कारागृहात घालवावी लागली. माओवादी खटल्यामधून देखील त्यांची निर्दाेष सुटका हाेईल. राज्य सरकार खाेट्या खटल्यांमध्ये त्यांना गाेवून त्यांना त्रास देत आहे. राव यांच्या अटकेतून इतर विचारवंतांनी बाेलू नये असाच संदेश सरकार समजात देत आहे. माेदींच्या कार्यकाळात फॅसिस्ट शक्ती जाेर धरत आहेत. या आधीच्या खटल्यांमध्ये त्यांच्यावर आत्ताच्या खटल्याप्रमाणेच आराेप लावण्यात आले हाेते. या खटल्यात माेदींच्या खुनाचा कट रचण्यात आल्याचे म्हंटले हाेते, परंतु चार्जशीटमध्ये त्याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. माध्यमांसमाेर सांगण्यासाठी हा आराेप लावण्यात आला हाेता. या खटल्यातून देखील राव हे निर्दाेष सुटतील असा आम्हाला विश्वास आहे.
दरम्यान या 26 लाेकांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या देवीप्रिया सुद्धा हाेत्या. देवीप्रिया यांनी फेब्रुवारी महिन्यात राव यांच्या समर्थनार्थ एक कवी संमेलन घेतले हाेते, त्यावेळी पुण्याला येण्याचे ठरवण्यात आले हाेते. आज शिवाजीनगर न्यायालयात येण्यापूर्वी या विचारवंतांनी काेरेगाव भीमा विजयस्तंभाला भेट दिली. तसेच फुले वाड्यालाही भेट देण्यात आली.