फर्ग्युसन टेकडीवरून २७ फुलपाखरं गेली ‘उडून’! वृक्षतोड अन् अधिवास नष्ट झाल्याचा परिणाम
By श्रीकिशन काळे | Published: April 8, 2024 01:59 PM2024-04-08T13:59:15+5:302024-04-08T14:01:40+5:30
परागीभवनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे फुलपाखरेच कमी होत असल्याने जैवविविधताही धोक्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे....
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये आणि तेथील टेकडीवर दोन दशकांपूर्वी ९३ च्या वर फुलपाखरांच्या प्रजाती दिसून येत होत्या. आता त्यात विविध कारणांमुळे घट झाली असून, तिथे वर्षभराच्या सर्वेक्षणातून ६६ प्रजाती आढळून आल्या आहेत. भरमसाट वृक्षतोड, वाढते प्रदूषण, टेकडीवर केलेले चुकीचे वृक्षारोपण, फुलपाखरांचा अधिवास नष्ट होणे आदी कारणांमुळे या प्रजाती नामशेष होत असल्याचे फुलपाखरू अभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. परागीभवनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे फुलपाखरेच कमी होत असल्याने जैवविविधताही धोक्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे.
या संशोधनामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रा. रूपाली गायकवाड, फुलपाखरू अभ्यासक रजत जोशी, मुल्ला अमीर यांनी सहभाग घेतला. त्यांनी जुलै २०२१ ते जून २०२२ यादरम्यान फुलपाखरांची पाहणी केली. त्याची नोंद ठेवून त्याविषयीचे संशोधन आता प्रकाशित केले. या ठिकाणी पाच फॅमिलीचे ६६ फुलपाखरू पाहायला मिळाले. कॅम्पसमध्ये हेस्पेरायडी (hesperiidae), लायसीनिडी (Lycaenidae), निम्फॅलिडी (Nymphalidae), पिरिडे (Pieridae) आणि पॅपिलिओनिडे (Papilionidae) या पाच फॅमिलींचा समावेश आहे. लायसीनिडी या फॅमिलीचे सर्वाधिक २२ प्रजाती दिसल्या. फुलपाखरांसाठी आवश्यक असणाऱ्या १४ वनस्पती येथे आढळल्या. भारतामध्ये फुलपाखरांच्या १५०१ प्रजाती आहेत. त्यातील सह्याद्रीमध्ये ३३१ दिसतात. परागीभवनाचे अतिशय मोलाचे काम ही फुलपाखरे करत आहेत. प्रसिद्ध फुलपाखरू संशोधक कृष्णमेघ कुंटे यांनी २००१ मध्ये पुणे शहरात सर्वेक्षण केले होते, तेव्हा १०५ फुलपाखरांच्या प्रजाती दिसल्या. तर वेताळ टेकडीवर २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जोशी यांना ८७ फुलपाखरू आढळले होते.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये संशोधक कुमार यांनी १९८४ मध्ये सर्वेक्षण केले, तेव्हा त्यांना ९३ फुलपाखरांच्या प्रजाती दिसल्या. आता रजत जोशी यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा उद्देश पूर्वीच्या तुलनेत येथील जैवविविधता संपन्न आहे का? फुलपाखरांचा अधिवास आहे का? हा होता.
फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर १०९ एकराचा आहे. येथील टेकडी ही वेताळ टेकडीशी जोडलेली होती. पण १९६० मध्ये सेनापती बापट रस्ता झाल्याने टेकडी वेगळी झाली. त्यामुळे वन्यजीवांचा कॉरिडॉरही नष्ट झाला. वन्यजीवही कमी झाला.
सर्वेक्षण कसे केले?
सकाळी ८.३० ते ११ या वेळेत सर्वाधिक फुलपाखरे सक्रिय असतात. तेव्हा नोंदणी केली. आठवड्यातून दोनदा ही पाहणी केली. जीपीएस लोकेशनचा वापर केला. तसेच ‘माय जीपीएस कोऑर्डिनेट्स’ या ॲपचा वापर करून नोंदी केल्याचे रजत जोशीने सांगितले.
फुलपाखरांच्या सध्याच्या प्रजाती !
फर्ग्युसन कॅम्पस व टेकडीवर राज्य फुलपाखरू ब्ल्यू मोरमॉन, टेल जे, कॉमन जे, कॉमन रोझ, ग्रास डेमॉन, राइस स्वीफ्ट, कॉमन रेड आय, लेमन एमीग्रन्ट, इंडियन जजेबल, स्ट्राइप्ड टायगर, ग्लासी टायगर, ब्ल्यू टायगर, झेब्रा ब्ल्यू, रेड फ्लॅश, ब्ल्यू पॅन्सी, कमांडर, लाइम ब्ल्यू आदी ६६ प्रजातीची फुलपाखरे आढळली.
फुलपाखरांवर दृष्टिक्षेप :
१) पॅपिलिओनिडे- ६ ----- ९.०९ टक्के
२) पिरिडे - १० ----- १५.१५ टक्के
३) लायसीनिडी - २२ ------ ३३.३३ टक्के
४) निम्फॅलिडी - २० ---- ३०.३० टक्के
५) हेस्पेरायडी - ८ ------- १२.१२ टक्के
एकूण - ६६ - १०० टक्के
नेक्टर प्लांट अन् होस्ट प्लांट !
कॅम्पसमध्ये फुलपाखरांच्या सॅपिंडस मुकोरोसी, लॅन्टर्न, इग्झोरा, सीडा अक्यूटा, जट्रोपा या पाच नेक्टर प्लांट आढळल्या. तर १४ होस्ट प्लांट पाहायला मिळाले.
काय करायला हवे?
टेकडीवर गवताचे प्रकार, झुडुपं, वेली लावणे आवश्यक आहे. गवताळ प्रदेशाचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
या प्रजाती गायब!
टेकडीवर पूर्वी ब्लॅक राजा, थ्री स्पॉट ग्रास यलो आणि ब्ल्यू ओकलिफ दिसत होते. पण आता ते दिसून येत नाही.
धोके काय?
फर्ग्युसन टेकडीवर अनियंत्रित वृक्षारोपण होत आहे. वडाची, उंबराची झाडे लावली जात आहेत. पण टेकडी झुडुपांचा अधिवास असलेली आहे. तिथे चुकीचे वृक्ष लावले जात आहेत. त्यामुळे टेकडीवरील फुलपाखरांचा अधिवास नष्ट होत आहे. वणव्याचा आणि राडारोडा टाकल्यामुळे टेकडी धोक्यात आली आहे.
- रजत जोशी, फुलपाखरू अभ्यासक