जि.प.साठी २७ लाख ४९ हजार मतदार
By admin | Published: January 22, 2017 04:35 AM2017-01-22T04:35:29+5:302017-01-22T04:35:29+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवार (दि.२१) रोजी प्रसिध्द करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २७ लाख ४९ हजार १६९ मतदार
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवार (दि.२१) रोजी प्रसिध्द करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २७ लाख ४९ हजार १६९ मतदार निवडणुकीसाठी आपला हक्क बजावणार आहेत.
जिल्हा परिषदेसाठी ७५ गट तर १३ पंचायत समित्यांमध्ये १५० गणांसाठी ही निवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यावेळी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून गट-गणांची फेररचना करण्यात आली. जिल्ह्यात दहा वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने गट-गणांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. कायद्यानुसार जिल्ह्यातील एकूण गटांची संख्या ७५ च ठेवण्यात आली असली तरी तालुकास्तारवर गटांच्या संख्येत फेरबदल करण्यात आले. यामध्ये एकट्या हवेली तालुक्यात तीन गटांची भर पडली, तर शिरुर तालुक्यामध्ये नव्याने एक गट वाढविण्यात आला. यामुळे जुन्नर, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील प्रत्येक एक गट कमी झाला आहे. यामुळे मतदार याद्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, गट-गण निहाय मतदार याद्या फोटण्यात आल्या.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष मतदार नाव नोंदणी मोहिम घेऊन तयार केलेल्या मतदार याद्याच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकासाठी वापरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयाने गट-गणानुसार प्रारुप मदार यादी प्रसिध्द करून हरकती व सूचना मागविल्या. या प्रारुम मतदार यादीवर जिल्ह्यातून शंभर हून अधिक हरकती घेण्यात आल्या होत्या.
या हरकतीवर सुनावणी घेऊन अखेर शनिवारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या कमी झाली असून, २७ लाख ४९ हजार १६९ मतदारांची यादी प्रसिध्द करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात १४ लाख १६ हजार ७११ पुरुष तर १३ लाख २ हजार ४४६ महिला मतदार आहेत. तर यावेळी प्रथमच १२ मतदारांची इतर मतदार म्हणून नोंद झाली आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात २ लाख ६३ हजार, आंबेगाव- १ लाख ७२ हजार, शिरुर-२ लाख ३७ हजार, खेड-२ लाख ६३ हजार, मावळ-१ लाख ७६ हजार, मुळशी-१ लाख २१ हजार, हवेली- ४ लाख ५१ हजार, दौंड- २ लाख ३२ हजार, पुरंदर १ लाख ५६ हजार, वेल्हा- ४६ हजार ४५४, भोर- १ लाख ३२ हजार, बारामती- २ लाख ४७ हजार, आणि इंदापूर तालुक्यात २ लाख ६६ हजार मतदार आहेत.