स्वस्तात वाहने देण्याच्या बहाण्याने २७ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 07:36 PM2018-10-04T19:36:24+5:302018-10-04T19:37:27+5:30
कमी किंमतीत वाहने देण्याचे आमिष दाखवून बुकींगसाठी २७ लाख १० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकास अटक केली आहे.
पुणे : कमी किंमतीत वाहने देण्याचे आमिष दाखवून बुकींगसाठी २७ लाख १० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकास अटक केली आहे.
अझर रौख शेख (वय २५, रा. आयशा कॉम्पलेक्स, पेन्शनवाला मस्जिदसमोर, रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी हनिफ उर्फ आरीफ दस्तगिर सय्यद (वय ३४, रा. कोंढवा) याला अटक केली आहे. रोहीत गणेश गायकवाड (वय २५, रा. ताडीवाला रस्ता) यांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपीनी फिर्यादी यांना कमी किंमतीत दुचाकी आणि चारचाकी वाहने देण्याचे सांगुन त्यांच्या विश्वास संपादीत केला. त्यानंतर ७ ते ८ लोकांकडून वाहनांच्या बुकिंगसाठी ३० जानेवारी ते २९ सप्टेंबर दरम्यान १५ लाख ५० हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. मात्र वाहने न देता फसवणूक केली. वाहन न मिळाल्याने फिर्यादींकडे बुकींगसाठी टोकन दिलेल्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यामुळे फिर्यादी यांचे वडील गणेश गायकवाड (वय ५६) यांनी घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे, अशी फिर्याद देण्यात आली आहे. फसवणूक केलेली रक्कम २७ लाख १० हजार रुपयांपर्यंत पोहचल्याचे तपासातून समोर आले आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी कोणाला फसवले आहे का याचा तपास करण्यासाठी शेख याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार त्याला ८ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.