NRI कोट्यातून मेडिकलला ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, २७ लाखांना गंडा
By नितीश गोवंडे | Updated: November 27, 2023 16:04 IST2023-11-27T16:03:28+5:302023-11-27T16:04:02+5:30
प्रकार डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला आहे....

NRI कोट्यातून मेडिकलला ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, २७ लाखांना गंडा
पुणे : मुलीला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवून देतो असे सांगत तिघांनी एका व्यावसायिकाची २७ लाख २६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महेंद्र खंडेराव देशमुख (५९, दिगंबर कॉलनी, वारजे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (रा. चिखली, पुणे) आणि राहुल तुपेरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र देशमुख यांचा पुस्तक विक्रीचा व्यवसाय आहे. त्यातूनच आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली होती. आरोपी पवन सूर्यवंशी याने फिर्यादी महेंद्र देशमुख यांना तुमच्या मुलीला मेडिकलला ऍडमिशन मिळवून देतो असे सांगितले. यानंतर सूर्यवंशी याने आरोपी जयेश शिंदे याची ओळख फिर्यादी यांना करून दिली. जयेश शिंदे याने फिर्यादी यांना तुमच्या मुलीला एनआरआय कोट्यातून मेडिकल ऍडमिशन मिळवून देतो असे सांगत वेळोवेळी ऑनलाईन आणि कॅश स्वरूपात २७ लाख २६ हजार घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर करत आहेत.