‘ते’ झाड होते म्हणून वाचले २७ प्रवाशांचे प्राण, चालकाविना बस चालली ८०० मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:46 PM2018-04-07T18:46:42+5:302018-04-07T18:48:33+5:30
काळजाचा ठोका चुकविणारा हा क्षण प्रवाशांनी शनिवारी (दि.७ एप्रिल) पहाटे मंचर जवळील भोरवाडी येथे अनुभवला.
मंचर : नाशिक-पुणे ही शिवशाही एसटी बस २७ प्रवाशांना घेऊन निघालेली होती. भोरवाडीजवळ बस रस्ता दुभाजकाला धडकल्याने चालक बाहेर फेकला गेला. त्यानंतर ही बस चालकाविना तब्बल ८०० मीटर अंतरावर जावून एका झाडाजवळ थांबली. दरम्यान, चालक जाग्यावर नसल्याचे पाहून एका प्रवाशाने उडी मारल्याने तो जखमी झाला. इतर सर्व प्रवाशी सुखरुप आहे. मात्र, काळजाचा ठोका चुकविणारा हा क्षण प्रवाशांनी शनिवारी (दि.७ एप्रिल) पहाटे मंचर जवळील भोरवाडी येथे अनुभवला.
पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस सुसाट चालताना दिसतात. या बस आकर्षक असल्याने लक्ष वेधून घेत आहे. तसेच प्रवाशांना या बसमधून प्रवास करण्याची उत्सुकता निर्माण करत आहे. परंतु, शनिवारी नाशिक आगाराची शिवशाही एसटी बस (एमएच.०६. बी.डब्ल्यू. ०६४७ ) ही २७ प्रवाशांना घेवून नाशिक येथून पुण्याला येत होती. बसने मंचर सोडल्यानंतर ती भोरवाडी जवळील पुलावर आली. येथून पुढे खेड-सिन्नर चौपदरी रस्ता सुरु होतो. ये- जा करण्यासाठी दोन स्वतंत्र रस्ते असून मध्ये दुभाजक आहे. नवीन चालकांना रस्ता लगेच समजून येत नाही. शिवाय चौपदरी रस्त्यावर प्रवेश करताना जागा अरुंद आहे.
द्रुतगती रस्त्यावर शिवशाही बसने प्रवेश करताच रस्ता दुभाजकाला बसची धडक बसली. धडकेने चालक मोहन भिसे यांचा ताबा सुटून भिसे एसटी बाहेर फेकले गेले. मग चालकाविना असलेली एस.टी. बस पूर्वेला वळली. बसने पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या एका ढाब्याच्या इमारतीला किंचित धक्का दिला. त्यानंतर अनेक अडथळे पार करत ही बस पुढे गेली. या दरम्यान बसमधील प्रवाशांच्या जीवाचा अक्षरश: थरकाप उडाला. त्यांनी आरडा ओरडा केला. या दरम्यान गाडीतील एक प्रवाशी निलेश वाघ (रा.नाशिक) हे काय झाले पाहण्यासाठी चालकाजवळ गेले तेव्हा त्यांना चालक जाग्यावर नसल्याचे दिसले. घाबरलेले वाघ यांनी चालत्या गाडीतून उडी टाकल्याने ते जखमी झाले आहे.
महामार्गापासून तब्बल ८०० फूट अंतरावर जावून शिवशाही बस एका झाडाजवळ जावून थांबली. विशेष म्हणजे झाड व बसमध्ये थोडेच अंतर राहिले होते. या अपघातात आतील प्रवासी सुरक्षित राहिले आहेत. चालक भिसे व घाबरुन उडी मारलेले निलेश वाघ हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एसटीचे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
पुणे-नाशिक महामार्गालगतच्या शेतातून शिवशाही बस ८०० फूट चालकाविना पुढे गेली. बस ज्या मार्गाने गेली तेथे एखादी विहीर, घर अथवा भिंत असती तर मोठी दुर्घटना घडली असती. खेड-सिन्नर बाह्यवळण रस्त्याचे काम अपुर्ण आहे. या भागात नेहमीच अपघात होत असतात. त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.