कृषी विभागाच्या डीबीटीसाठी २७ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 08:21 PM2018-08-02T20:21:17+5:302018-08-02T20:29:40+5:30
वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना शेतीची औजारे आणि साहित्य देण्यात येणार आहे.
पुणे : कृषी विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत शेती औजारे आणि साहित्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २७ हजार ६२७ शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले आहेत. यात कडबाकुट्टी यंत्राला सर्वाधिक मागणी असून, जवळपास ५ हजार ४५३ जणांनी यासाठी अर्ज केल्याची माहिती कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.
वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना शेतीची औजारे आणि साहित्य देण्यात येणार आहे. या योजनेबाबत विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे यावर्षी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी जवळपास २७ हजार ६२७ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले. जुन्नर तालुक्यातून ४ हजार ५३२ अर्ज आले आहेत. बारामती येथून ३ हजार ५५१ अर्ज, खेड तालुक्यातून तीन हजार, तर शिरूर तालुक्यातून ३ हजार १७८ अर्ज आले आहेत, आंबेगाव तालुक्यातून २ हजार ३९, दौंड तालुक्यातून २ हजार ५२१, इंदापूर तालुक्यातून २ हजार २१४, भोर तालुक्यातून १ हजार ८३७, पुरंदर तालुक्यातून १ हजार ५६५, हवेली तालुक्यातून १ हजार ९३ अर्ज आले आहेत. सर्वात कमी अर्ज हे वेल्हा तालुक्यातून ३९१ आणि मुळशी येथून ४२५ अर्ज, तर मावळ येथून ५८१ अर्ज आले आहेत.
............
जिल्हा परिषदेतर्फे शेतकऱ्यांसाठी डीबीटी योजनेंतर्गत विविध साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकाला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
सुनील खैरनार
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
......................
या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते आणि कृषी विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी मूळ निधीमध्ये १३ लाखांच्या वाढीव निधीची तरतूद केली आहे. एकूण ५ कोटी ५२ लाख ९० हजार रुपये इतक्या निधीची तरतूद आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना राबविण्यात येत आहेत.