ज्वेलरीचे दुकान फोडून २७ हजारांचे दागिने लंपास; त्याच चोरट्यांकडून मोबाईल दुकानातील चोरीचा प्रयत्न असफल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 04:40 PM2021-07-06T16:40:28+5:302021-07-06T16:40:34+5:30
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ज्वेलरी दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस
लोणी काळभोर: लोणी काळभोर येथे तिघांनी सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ज्वेलरी दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानातून रोख रक्कमेसह ३६० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २७ हजार ५०० रुपये किंमतीचा माल चोरांनी पळून नेला आहे. याप्रकरणी ओम राजेंद्र वर्मा ( वय ३४, रा. त्रिमुर्ती चौक, लोणी काळभोर ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा यांचे लोणी काळभोर गावातील खोकलाई देवी चौकात मालती कॉम्ल्पेक्स मध्ये ओम धनेश ज्वेलर्स हे दुकान आहे. सोमवारी दुपारी ते सोनार कामासाठी पुण्यातील रविवार पेठेत दुुुुकान बंद करुन गेले होते. मंगळवार पहाटे ५ वाजण्याच्या सुमारांस त्यांची चुलती सविता वर्मा या पहाटे वॉकिंगसाठी दुकानासमोरून जात असताना त्यांना शटर हे उचकटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी ओम यांना फोन करून सांगितल्यावर ते तातडीने दुकानाजवळ पोहोचले. त्यावेळी दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता पहाटे ४ वाजण्याच्या सुमारांस सुमारास तिघे दुकानाचे शटर उचकटून चांदी व रोख रक्कम चोरी करीत असल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांना त्यांचे मित्र योगेश जवाहरलाल शर्मा (वय २७, रा. नेहरू चौक ) यांचे साई मारवन्स टेलीकॉम नांवाचे मोबाईलचे दुकान फोडले असल्याचे कळाले. त्यावेळी तिघांनी दुकानाचे सेंन्टर लॉक तोडून मोबाईल व इतर रोकड चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ते असफल झाल्याने काहीही चोरीस गेलेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत.