गुलटेकडीला पकडली पावणेतीन लाखांची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 09:35 AM2019-04-16T09:35:47+5:302019-04-16T09:37:36+5:30
स्थिर स्थावर पथकाची कारवाई : पैसे, साहित्य, दारू वाटप विरोधी तपासणी कसून
पुणे : लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पैसे, मद्य आणि वस्तू वाटपाबाबत जागोजागी भरारी पथके आणि पोलीस यंत्रणा वाहनांची तपासणी करीत आहेत. निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर स्थावर पथकाने पोलिसांच्या मदतीने गुलटेकडी येथील सॅलेसबरी पार्कजवळ पावणेतीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम जप्त करून स्वारगेट पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात मुकुंदनगर येथे एका तेल व्यापाऱ्याकडून २० लाखांची रोकड पहाटे तीनच्या सुमारास पकडण्यात आले होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, स्थिर स्थावर पथक क्र. १ चे अधिकारी सचिन प्रकाश पवार, आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका तथा इलेक्शन मॅजिस्ट्रेट (एसएसटी क्र. १ ३४ - लोकसभा २१२ पर्वती मतदार संघ) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गुलटेकडी परिसरात रात्री गस्त घालीत होते. सॅलेसबरी पार्क येथील पुनावाला गार्डनजवळ मंगळवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान वाहन तपासणी करीत असताना एका मोटारीमध्ये रोकड आढळून आली.
यासंदर्भात पवार यांनी भरारी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत देंडगे यांना या पैशांबद्दल माहिती दिली. उपनिरीक्षक देंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही रोकड महेंद्र मांगीलाल कावेडीया, (वय ५४, रा. २१४२ न्यु मोदी खाना, कॅम्प) यांची असल्याचे निष्पन्न झाले. लोकसभा निवडणुक अचार संहितेच्या कार्यवाही नुसार ही रोख रक्कम स्थिर स्थावर पथकाचे अधिकारी पवार यांनी जप्ती पंचनामा करून जप्त केली. ही रोकड स्वारगेट पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आली आहे.
ही मोटार आणि रोकड महेंद्र कावेडीया यांची आहे. ते त्यांची मोटार घेऊन जात असताना स्थावर पथकाने त्यांची मोटार थांबविली. मोटारीची तपासणी केली असता पावणेतीन लाखांची रोकड आढळून आली. ही रोकड जप्त करण्यात आली आहे.