बारामतीत सहा तासांमध्ये २७.५५ टक्के मतदान; उन्हाचा चटका वाढल्याने मतदान संथ गतीने
By नितीन चौधरी | Published: May 7, 2024 02:35 PM2024-05-07T14:35:26+5:302024-05-07T14:35:50+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत असून महायुतीतर्फे सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीतर्फे सुप्रिया सुळे निवडणूक लढवीत आहेत
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्या सहा तासांमध्ये अर्थात सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत २७.५५ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक मतदान भोर विधानसभा मतदारसंघात ३३.४१ टक्के झाले आहे. त्याखालोखाल बारामती विधानसभा मतदारसंघात ३२.११ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत असून महायुतीतर्फे सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीतर्फे सुप्रिया सुळे निवडणूक लढवीत आहेत. आज सुरू झालेल्या मतदानाच्या ७ ते ९ या दोन तासांच्या पहिल्या टप्प्यात या मतदारसंघात ५.७७ टक्के मतदान झाले. या टप्प्यात सर्वाधिक मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात ७.७५ टक्के, भोर मतदारसंघात ५.३५ टक्के, दौंड मतदारसंघात ५.५० टक्के, खडकवासला मतदारसंघात ६ टक्के, इंदापूर मतदारसंघात ५ टक्के मतदान नोंदविण्यात आले होते.
मतदानाच्या दुसऱ्या अर्थात ९ ते ११ या वेळेत एकूण मतदान १४.६४ टक्के नोंदविण्यात आले. अपेक्षेनुसार बारामती मतदारसंघात या टप्प्यात एकूण १८.६३ टक्के, इंदापूर मतदारसंघात १४.४८ टक्के, पुरंदर मतदारसंघात १४.८०, भोर मतदारसंघात १३.८०, खडकवासला मतदारसंघात १४, तर दौंड मतदारसंघात १२ टक्के मतदान नोंदविण्यात आले.
मतदानाच्या तिसऱ्या अर्थात ११ ते १ या वेळेत एकूण मतदान २७.५५ टक्के नोंदविण्यात आले. सर्वाधिक मतदान भोर मतदारसंघात ३३.४१ तर त्या खालोखाल बारामती विधानसभा मतदारसंघात ३२.११ टक्के मतदान नोंदविण्यात आले. इंदापूर मतदारसंघात २५.१०, पुरंदर मतदारसंघात २४.०५, दौंड मतदारसंघात २६ तर खडकवासला मतदारसंघात २५.१० टक्के मतदान नोंदविण्यात आले. उन्हाचा चटका वाढू लागल्याने अपेक्षेनुसार खडकवासला या शहरी मतदारसंघात मतदानाचा टक्का कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.