शेवगावात रंगणार २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन; ‘समाजभान’ देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:55 AM2018-01-23T11:55:06+5:302018-01-23T11:59:08+5:30

शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात २७ वे  मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

27th Marathi Balkumar Sahitya Sammelan to be held in Shevgaon; Trying to give 'Samajbhan' | शेवगावात रंगणार २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन; ‘समाजभान’ देण्याचा प्रयत्न

शेवगावात रंगणार २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन; ‘समाजभान’ देण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देबाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात कार्यक्रमांचे आयोजन सूत्रसंचालनापासून मुलाखती, परिचय यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी संवादक घेणार पुढाकार

पुणे : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे खडतर आयुष्य, त्यांचा जीवनसंघर्ष याबद्दलचे हृदयस्पर्शी मनोगत त्याच मुलांकडून ऐकताना समाजातील विदारक परिस्थितीची कल्पना येते. या परिस्थितीची लहान मुलांना जाणीव व्हावी आणि समाजभान जपण्याची सवय लागावी, यासाठी आगामी बालकुमार साहित्य संमेलनाचा हातभार लागणार आहे. मुलांचे हृदयस्पर्शी मनोगत आणि व्यवस्थेला त्यांनी विचारलेले प्रश्न उपस्थित केले जाणार असून, त्यांच्यासाठी निधी उभा केला जाणार आहे. संमेलन म्हणजे एक उत्सव न राहता बालकुमारांना योग्य वयात समाजभान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात २७ वे  मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, पदाधिकारी माधव राजगुरू, सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी स्वागताध्यक्ष हरीश भारदे व संयोजक संस्थेचे प्रा. रमेश भारदे, उमेश घेवरीकर, भाऊसाहेब शिंदे उपस्थित होते. 
संमेलनात कथाकथन, कवितांचा सांगीतिक कार्यक्रम, मुलाखत, बहारदार गाण्यांची मैफिल, कार्यशाळा, चित्र व कवितांचे प्रदर्शन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. समारोपसत्रात ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, मानसी सांडसे, शिक्षणाधिकारी माध्यमिक लक्ष्मण पोले उपस्थित राहणार आहेत. संमेलनानिमित्त आयोजित राज्यस्तर कथा-कवितालेखन स्पर्धेतील विजेत्यांचे सादरीकरण व पारितोषिक वितरण होणार आहे. 
संमेलनातील सूत्रसंचालनापासून मुलाखती, परिचय यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी संवादक पुढाकार घेणार आहेत. 

बालसाहित्यिक मुलांशी संवाद साधणार 
साहित्यिक ल. म. कडू यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनात बालकुमारांना बहारदार कार्यक्रम तसेच नामवंत बालसाहित्यिकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ग्रंथदिंडी, मिरवणूक, ग्रंथप्रदर्शन व विक्री यांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात साहित्यिक मंदार भारदे व दीपक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. नगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे व जयंत येलूलकर, अनिरुद्ध देवचक्के प्रमुख पाहुणे असतील. बाल आनंद मेळाव्यात बालसाहित्यिक मुलांशी संवाद साधणार आहेत. 

Web Title: 27th Marathi Balkumar Sahitya Sammelan to be held in Shevgaon; Trying to give 'Samajbhan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.