राज्यभरातील खुल्या कारागृहातून पाच वर्षात २८ कैदी पळाले; भविष्याची चिंता, कौटुंबिक कलह अशी कारणे
By विवेक भुसे | Published: November 21, 2023 07:56 PM2023-11-21T19:56:04+5:302023-11-21T20:07:10+5:30
महाराष्ट्रात खुले कारागृहातून कैदी पळून जाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे
पुणे: खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा कारागृहातून पळून गेल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच वर्षात राज्यभरातील खुल्या कारागृहातून २८ कैदी पळून गेल्याचे समोर आले आहे.
ज्या कैद्यांचे वर्तन कारागृहामध्ये चांगले असते, अशा कैद्यांना खुले कारागृहामध्ये ठेवण्यात येते. त्यामध्ये त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असतो. खुले कारागृह म्हणजे कैदी बिना भिंतीच्या रहिवासात अगदी कमीत कमी देखरेखीखाली असतो. आंतकवादी, ड्रग माफिया किंवा तत्सम गुन्हेगार, महिला विरोधी गुन्हे करणारे कैदी यांना खुल्या कारागृहातून वगळण्यात येते. ज्यांचे उत्कृष्ट वर्तन असते. अशांची निवड खुले कारागृहासाठी केली जाते.
येरवडा खुले कारागृहाची क्षमता १७२ पुरुष कैद्यांची आहे. सध्या या कारागृहात २०७ कैदी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय महिला खुले कारागृहाची क्षमता ५० असून त्यात ३८ कैदी ठेवण्यात आले आहेत. पाच वर्षात २८ कैदी गेले पळून राज्यातील विविध खुल्या कारागृहात पुरुष १५१२ आणि स्त्रीया १०० अशा एकूण १६१२ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. सध्या या खुल्या कारागृहात १६४४ पुरुष आणि ६२ स्त्री कैदी ठेवण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षात या खुल्या कारागृहातून एकूण २८ कैदी पळून गेले आहेत.
खुले कारागृहातून पलायन केलेले कैदी
२०१९ - ९
२०२० - ७
२०२१ - ३
२०२२ - ३
२०२३ - ६ (आजअखेर)
भविष्याची चिंता, कौटुंबिक कलह
बहुतांशी कैद्यांनी भविष्याची चिंता किंवा कौटुंबिक कलहामुळे खुल्या कारागृहातून पलायन केले असल्याचे कारण पुढे आले आहे. खुले कारागृहातील सोयी सवलती, तिथे मिळणारी जास्तीची माफी, तिथे मिळणारे जास्तीचे डायट यामुळे कैदी बंद कारागृहात चांगले काम करुन, शिस्तीचे पालन करतात. आपले वर्तन चांगले ठेवून खुले कारागृहात राहण्याची प्रयत्न करीत असतात. त्याला आयुष्यात पुढे जाण्याकरीता तसेच मोकळ्या वातावरणात राहण्यासाठी कैद्यांना ही एक उत्तम संधी असते. कमीत कमी देखरेखीखाली मुक्तपणे खुल्या कारागृहात कैदी वावरत असल्याने त्यांना कारागृहाबाहेर पळून जाण्यासाठी बराच वाव आहे. परंतु, महाराष्ट्रात खुले कारागृहातून कैदी पळून जाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे.