पुणे-मुंबई महामार्गावर वर्षभरात २८ जणांचा मृत्यू; तर ३१ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:47 PM2023-01-24T12:47:26+5:302023-01-24T12:47:35+5:30
किरकोळ जखमी आणि किरकोळ अपघातांची तर मोजदादच नाही
पुणे: गेल्या वर्षभरात पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला असून, ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी आणि किरकोळ अपघातांची तर मोजदादच नाही. महामार्ग पोलिस पुणे विभागांतर्गत २०२२ वर्षाची ही नोंद आहे.
महामार्गावरून प्रवास करत असताना वाहतूक नियमांचे पालन न करणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे, वाहनाचा अनियंत्रित वेग, अपघात प्रवण क्षेत्र यामुळे अनेक अपघात होत आहेत. याची नोंद महामार्ग पोलिसांकडून ठेवली जाते. पुणे विभागात असलेल्या महामार्ग पोलिसांच्या खंडाळा आणि वडगाव केंद्रादरम्यान झालेले हे अपघात आहेत.
अपघात रोखण्यासाठी...
- द्रुतगती मार्गावर तुटलेले रोप बॅरियर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी साईन बोर्ड बसवण्यासाठी आयआरबी आणि एमएसआरडीसी यांच्याकडे पाठपुरावा करून महामार्ग पाेलिसांनी हे काम पूर्ण करून घेतले.
- टोलनाक्यांवर थांबून विनासीटबेल्ट वाहन चालवणाऱ्यांचे प्रबोधन केले, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.
- द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांनी लेन कटिंग करू नये, यासाठी शासकीय वाहनांच्या ध्वनिक्षेपकांवरून आवाहन केले. तसेच लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.
- महामार्गावर अनधिकृतपणे थांबणाऱ्या वाहनांवर पेट्रोलिंगच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली, तसेच ती वाहने लगेच हटवण्यात आली.
- सीटबेल्ट न लावणाऱ्या तसेच लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी एक पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस कर्मचारी यांचे पथक सुरू केले.
एकूण अपघात, मृत्यूंची संख्या आणि जखमी..
पुणे विभागातील खंडाळा आणि वडगाव या दोन ठिकाणी वर्षभरात ४५ अपघात झाले. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण गंभीर जखमी झाले.