पुणे शहरात २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २८ हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री

By नितीन चौधरी | Published: September 5, 2023 05:07 PM2023-09-05T17:07:30+5:302023-09-05T17:07:47+5:30

२०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये पुण्यात घरांच्या विक्रीत ४० टक्क्यांनी वाढ होऊन यंदाच्या पहिल्या सहामाहीत ही विक्री तब्बल ४५ हजार इतकी झाली

28 thousand crore house sales in Pune city in the first half of 2023 | पुणे शहरात २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २८ हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री

पुणे शहरात २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २८ हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री

googlenewsNext

पुणे: भारतातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील रिअल इस्टेट बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी बाजारपेठ असल्याचे क्रेडाई सीआरई अहवालाद्वारे समोर आले आहे. तसेच २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये पुण्यात घरांच्या विक्रीत ४० टक्क्यांनी वाढ होऊन यंदाच्या पहिल्या सहामाहीत ही विक्री तब्बल ४५ हजार इतकी झाली आहे. तर किंमतींबाबतही २०२९ च्या तुलनेत २०२३ मध्ये ३७ टक्क्यांची वाढ (२८ हजार कोटी) नोंदविण्यात आली आहे. २०१९ मध्ये १ कोटींत असलेल्या सदनिकांची विक्री २०२३ मध्ये २५० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण आहे. तसेच २०१९ च्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहारांत तब्बल ९० टक्के वाढ झाली आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोचा सीआरई अहवाल नुकताच सादर झाला. या अहवालानुसार मागील सहामाहीत (जानेवारी- जून २०२३) समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुणे शहराची रिअल इस्टेट बाजारपेठ ही भारतातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत सर्वात वेगाने वाढणारी आणि परवडणारी बाजारपेठ ठरली आहे. या कालावधीतील पुनर्विक्री वगळून पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये तब्बल ४५ हजार घरांची विक्री झाली आहे. याची किंमत ही तब्बल २८ हजार कोटी रुपये इतकी असून २०१९ च्या तुलनेत यामध्ये ९० टक्के वाढ झाली आहे.

४५ हजार घरांची विक्री

यावेळी सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता म्हणाले, “२०१९ आणि २०२३ च्या पहिल्या सहामाहीचा विचार केल्यास पुणे शहरात २०२३ मध्ये ४५,१६२ घरांची विक्री झाली. २०१९ च्या पहिल्या सहामाहीत घरांची विक्री ही ३२,२५० इतकी होती. याचाच अर्थ कोरोना पूर्व काळाच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीत घरांची विक्री ४० टक्क्यांनी वाढली आहे.”

१ कोटी किमतीच्या घरांमध्ये २५० टक्के वाढ

तसेच पुण्यात २०२३ मधील पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही ६३ लाख असून २०१९ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ही किंमत ३७ टक्क्यांनी जास्त आहे. यावरून असे लक्षात येते की घरांचा सरासरी आकार आणि किंमत या दोन्ही बाबी वाढत आहेत. शिवाय २०१९ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीत १ कोटी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत तबल २५० टक्क्यांची वाढ झाली आहे, याकडे गुप्ता यांनी लक्ष वेधले. सीआरई मॅट्रिक्सचे डेटा अॅनालिस्ट राहुल अजमेरा, क्रेडाई पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापकीय समिती सदस्य अभिषेक भटेवरा आणि महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर उपस्थित होते.

 गेल्या ४ वर्षांत अभूतपूर्व कामगिरी 

पुणे रिअल इस्टेट मार्केटने गेल्या ४ वर्षांत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. पुणे शहर परवडणारी रिअल इस्टेट बाजारपेठ ठरली आहे. हे चित्र आशादायक आहे.- रणजित नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे

Web Title: 28 thousand crore house sales in Pune city in the first half of 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.