घरफोडी करणार्या सराईताकडून १३ लाखांचे २८ तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:07 PM2021-03-30T19:07:14+5:302021-03-30T20:29:18+5:30
शंभरावर घरफोड्या करणारा जयड्या.....
पुणे : शहराच्या विविध भागात घरफोडी करणार्या सराईत घरफोडी चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ६० हजार रुपयांचे २८ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
जयवंत गोधर्वन गायकवाड ऊर्फ जयड्या (वय ३२, रा. आंबेडकर वस्ती, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना कारागृहातून सुटलेला आरोपी जयवंत गायकवाड याने मोठी घरफोडी केली असून तो सोलापूरला जाण्याच्या तयारी असल्याची माहिती हवालदार अजय गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शिवाजीनगर गावठाणात घरफोडी केल्याची कबुली दिली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तपासणी केली असताना २२ मार्च रोजी त्याने शिवाजीनगर गावठाणात घरफोडी करुन १२ लाख ६० हजार रुपयांचे २८ तोळे सोन्याचे लंपास केले होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रमोद टिळेकर, दीपक लांडगे, रमेश साबळे, दयाराम शेगर, संजय दळवी, स्नेहल जाधव यांच्या पथकाने केली. .......
शंभरावर घरफोड्या करणारा जयड्या
जयवंत ऊर्फ जयड्या गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. गायकवाड याने शहराच्या वेगवेगळ्या भागात सातत्याने घरफोड्या केल्या असून आतापर्यंत त्याने शंभरापेक्षा जास्त घरफोड्याचे गुन्हे केले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे व त्यांच्या पथकाने त्याला नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते. या गुन्ह्यांतून तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने शिवाजीनगरमध्ये मोठी घरफोडी केली होत. परंतु, त्यातील दागिन्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी पुन्हा पकडून चोरलेला सर्व ऐवज हस्तगत केला आहे.