शितपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन २८ वर्षीय महिला बाऊन्सरवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:37 PM2022-02-18T12:37:58+5:302022-02-18T12:43:12+5:30
अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल...
धनकवडी :कोल्हापूर येथे इव्हेंटचे काम असल्याचे सांगून एका २८ वर्षीय महिला बाऊन्सरवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील कात्रज येथे एका लॉजवर घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत महिला बाऊन्सरचे काम करते. तिला तिच्या एका मैत्रीणीच्या माध्यमातून कोल्हापूर येथे एक इव्हेंटचे काम मिळाले होते. संबंधित व्यक्ती आणि पिडीत महिला कात्रज येथून कोल्हापूरला जाणार होते. संबंधित व्यक्तीने पिडीत महिलेला कात्रज मध्ये एका लॉज मध्ये थांबायला सांगितले. तसेच अजूनही काहीजण येणार असल्याचे सांगितले. दरम्यान त्याने महिलेकडून सात हजार रुपये प्रवास खर्च म्हणून घेतले व शितपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आणि तेथून पळ काढला.
पिडीत महिला शुद्धीवर आल्यानंतर अतिप्रसंग झाल्याची जाणीव झाली आणि तिने तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे करत आहेत.