घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये २८ वर्षे फरारी आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:09+5:302021-04-12T04:10:09+5:30
पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये गेल्या २८ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ...
पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये गेल्या २८ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये १९९२ मध्ये घरफोडीच्या गुन्हयात आरोपी फरार झाला होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने आरोपीला जेरबंद केले.
विष्णू सुंदरराव वीटकर (वय ४५, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट ३ चे पथक हद्दीमध्ये गस्त घालत असताना सहायक पोलीस फौजदार निंबाळकर यांना हा आरोपी हडपसर गाडीतळ येथे आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शनिवारी (दि.१०) दुपारी ३ च्या सुमारास सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कारवाई करिता कोथरूड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस कर्मचारी महेश निंबाळकर, विल्सन डिसुझा, संतोष क्षीरसागर, सुजित पवार, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.
--------------
---------------------------------------------