राजगुरूनगर : २८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरला गंभीर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:20 PM2022-04-06T19:20:38+5:302022-04-06T19:31:08+5:30
राजगुरूनगर येथील घटना...
राजगुरुनगर : चांडोली फाटा येथे खाजगी रुग्णालयात २८ वर्षीय महिलेवर औषध उपचार सुरु असताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून डॉक्टरला नातेवाईकांनी गंभीर मारहाण केली. तसेच रुग्णालयाच्या काचा फोडल्याची घटना (दि ६ ) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडुस तुरुकवाडी (ता. खेड ) येथील निलोफर शमसुद्दीन मोमीन या २८ वर्षीय विवाहित महिलेने घरगुती कारणावरून विष प्राशन केले होते. पुढील औषध उपचारासाठी ४ दिवसांपूर्वी चांडोली फाटा येथील जीवनरक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दि. ६ रोजी दुपारी या महिलेचा उपचारादरम्यान मुत्यू झाला. रुग्ण दगावला कसा? अशी विचारणा संतप्त नातेवाईकांनी करत डॉ. रमेश शेजुळ (रा. राक्षेवाडी ता खेड ) यांना डोक्याला सॅनिटायझरच्या लोखंडी स्टँडने मारहाण केली.
तसेच हॉस्पिटलच्या काचा फोडल्या, या मारहाणीत डॉ. शेजुळ गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी चाकण येथे हलविण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक सतीश गुरव, पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार संतोष घोलप, संदिप भापकर, नवनाथ थिटे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमलेल्या जमाव व नातेवाईकांना शांत केले. याबाबत खेड पोलिस ठाण्यात दोन्ही बाजुने गुन्हा दाखल काम करण्याचे काम सुरू आहे.