२८ हजार लस आल्या, पण द्यायच्या कोणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:06+5:302021-05-12T04:13:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेला राज्य शासनाकडून २८ हजार लस मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाल्या़ मात्र या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेला राज्य शासनाकडून २८ हजार लस मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाल्या़ मात्र या लस नक्की कुठल्या वयोगटासाठी द्यायच्या, याचे निर्देश रात्री उशिरापर्यंत न आल्याने, या लसीकरणासाठीचे बुकिंग मंगळवारी रात्री आठ वाजता खुले करण्यात आले नाही़ राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण स्थगित करण्याचे जाहीर केल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या मात्र अद्याप लस न मिळालेल्या या वयोगटातील व्यक्तींचे काय करायचे याबद्दलही टोपेंच्या विधानामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
राज्य शासनाकडून महापालिकेला कोविशिल्डचे २८ हजार डोस मिळाले. सध्या महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालय (येरवडा) व कमला नेहरू रूग्णालय (मंगळवार पेठ) येथे १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण नियमित चालू असून, १७ मेपर्यंत येथे दररोज प्रत्येकी ५०० लस उपलब्ध करुन देण्यात आल्या. तर नव्याने सुरू केलेल्या तीन लसीकरण केंद्रांवर प्रारंभी प्राप्त झालेले को-व्हॅक्सिनचे डोस आता पूर्ण बंद झाल्याने या ठिकाणीही कोव्हिशिल्ड लसच देण्यात येत आहे़
परंतु, महापालिकेला मंगळवारी मिळालेले २८ हजार डोस आता १८ वर्षांपुढील सर्वांना द्यायचे की फक्त ४४ वर्षांपुढील व्यक्तींना आणि तेही केवळ दुसऱ्या डोससाठी या लसी वापरायच्या, याची सूचना राज्य शासनाने रात्री उशिरापर्यंत दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी रात्री ८ ऐवजी बुधवारी सकाळी ८ वाजता लसीकरणासाठीचे ऑनलाईन बुकिंग खुले करण्यात येणार आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे सर्व लसीकरण केंद्रांवर लसपुरवठा करून २० टक्के लस ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे़