धडाकेबाज! ८ महिन्यात २९ कारवाया अन् १७९ गुन्हेगारांवर मोक्का; ओंकारसिंग टाक टोळीवर मोक्का कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 09:56 PM2021-05-05T21:56:09+5:302021-05-05T21:56:36+5:30
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ महिन्यात करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
पुणे : जागा खाली कर अन्यथा आम्हाला २ लाख रुपये खंडणी मागणार्यांना नकार दिल्याने तलवार डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न करणार्या हडपसर येथील ओंकारसिंग टाक टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ महिन्यात करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख ओंकारसिंग करतारसिंग टाक (वय २६), सोरनसिंग करतारसिंग टाक (वय २१), अवतारसिंग करतारसिंग टाक (वय २८), जपानसिंग करतारसिंग टाक (वय ३१), तुफानसिंग करतारसिंग टाक (वय ३०, सर्व रा. गाडीतळ, हडपसर) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ओंकारसिंग टाक याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बेकायदेशीर टोळी तयार करुन खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करुन दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा टाकणे, खंडणी वसुल करणे अशा प्रकारची कृत्ये केली आहेत. त्यामुळे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या प्रस्तावाची छाननी करुन त्याला मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे करत आहेत.
अमिताभ गुप्ता यांनी गेल्या वर्षी २० सप्टेंबर २०२० रोजी पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध त्यांनी मोहिम उघडली. त्यात सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, मोका, एमपीडीएचा प्रभावी वापर करण्यात आला. अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही २९ वी कारवाई आहे. या वर्षातील ही २४ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.