जखडून बांधून ठेवलेल्या २९ जनावरांना मिळाले जीवनदान; कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या नराधमांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 04:42 PM2021-12-14T16:42:44+5:302021-12-14T16:42:53+5:30
बारामती तालुक्यातील सांगवी येथे कत्तलीला घेऊन जाण्यासाठी टेम्पोत व गोठ्यात बांधून ठेवलेल्या एकूण २९ जनावरांना गोठ्यावर पोलिस व गोरक्षकांच्या मदतीने जीवनदान देऊन सुटका करण्यात आली आहे
सांगवी (बारामती) : बारामती तालुक्यातील सांगवी येथे कत्तलीला घेऊन जाण्यासाठी टेम्पोत व गोठ्यात बांधून ठेवलेल्या एकूण २९ जनावरांना गोठ्यावर पोलिस व गोरक्षकांच्या मदतीने जीवनदान देऊन सुटका करण्यात आली आहे. रुषिकेश प्रभाकर देवकाते (वय २६) रा.निरावागज,(ता. बारामती.जि.पुणे) यांनी बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालक साकीब जावेद कुरेशी( वय २०, रा. म्हाडा कॉलनी गुणवडी रोड,ता.बारामती), टेम्पो चालक समीर सैपन शेख (वय २२ रा. मेखळी, ता.बारामती), बिलाल राजा शेख (वय २०, रा. निरावागज,ता.बारामती), उस्मान शेख,(वय२० ,रा. सरडे ,ता.फलटण), युसूफ सैपन शेख (वय२४ ,रा.सरडे,ता.फलटण ) यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी छापा टाकल्यावर काळ्या -पांढऱ्या रंगाच्या १३ जीवंत जर्सी गाई, तसेच सदर टेम्पो शेजारील गोठयातील ९ देशी बैल,२ जर्सी बैल,५ जर्सी गाई अशी एकुण २९ जनावरे दाटीवाटीने कोंबुन बांधलेली होती. सदर जनावरांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची व औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. ती सर्व जनावरे अशक्त व भुकेने व्याकुळ झालेली होती. सदर जनावरांबाबत साकीब जावेद कुरेशी यास विचारणा केली असता ती गोठयातील जनावरे आमचीच असुन ती कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. एक टेम्पो, १ लाख ३० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण ११ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले.
सोमवार (दि. १३ ) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगवी (ता.बारामती) येथील खंडोबानगर येथे काही अज्ञात परीरातील जनावरे एकत्र गोळा करून एका वाहनामध्ये भरून घेवून जाणार असल्याची माहिती गोरक्षक रुषिकेश देवकाते यांना मिळाली होती. त्यानंतर गोरक्षक हर्षद बबन देवकाते, महेश संभाजी पवार, नानासो माने,(रा. सुरवडी, ता.फलटण,जि.सातारा ) तसेच युवराज पांडूरंग डाळ,( रा.निरावागज, ता.बारामती) हे सांगवी येथील चांदणी चौक येथे एकत्र येऊन जनावरांबाबत पोलिसांना माहीती देऊन दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस व गोरक्षक हे गोपाळ तावरे यांच्या शेतातील गोठयाजवळ खात्री करण्यासाठी गेले. यावेळी तेथे एका टेम्पो हा संशयितरित्या थांबलेला आढळला. त्यावेळी टेम्पोला बाहेरून ताडपत्री लावून दोरी बांधत असलेल्या पाच जणांकडे विचारपूस केली. यावेळी पाहणी केल्यावर त्यामध्ये जनावरे हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आली. सदर जनावरे दाटीवाटीने कुरपणे, रस्सीने जखडून बांधून ठेवली होती. जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची सोय केलेली नव्हती. दरम्यान त्यांचे मेडीकल केल्याचे प्रमाणपत्रे तसेच कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले. असे नमूद फिर्यादीत म्हटले आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस हवालदार शशिकांत वाघ, आर.जे.कानगुडे,पोलिस नाईक राजेंद्र काळे, रावसाहेब गायकवाड, दत्तात्रय चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक दराडे, प्रशांत रावत यांनी ही कारवाई केली आहे.