नियम मोडणाऱ्यांकडून वसूल केले २९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:25+5:302021-05-25T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाकाळात बाहेर फिरण्यावर बंदी असताना, तसेच मास्क अनिवार्य असताना या नियांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाकाळात बाहेर फिरण्यावर बंदी असताना, तसेच मास्क अनिवार्य असताना या नियांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. गेल्या वर्षभरात आतापर्यंत ६ लाख ९७ हजार ५७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २९ कोटी ७३ लाख ८० हजार ८२३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून अद्यापही पालन होताना दिसत नाही. अनेक जण विनामास्क रस्त्यांवर फिरताना आढळत आहेत. तर दुकानदार, व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन असून मर्यादेपेक्षा जास्त वेळ दुकाने सुरू ठेवली जात आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची वेळ आहे. तर, शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन, असे निर्बंध प्रशासनातर्फे सुरू आहे. तसेच विनाकारण, विनामास्क फिरण्यावर बंदी आहे. मात्र, अनेक जण बिनदिक्कतपणे या नियमांचे उल्लंघन करून बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसत आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अशांवर थेट कारवाई करत त्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार महानगर पालिका, ग्रामपंचयात, नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस, तसेच वाहतूक शाखेकडून अशांवर गेल्या वर्षापासून कारवाई सुरू आहे.
पुणे महापालिकेने आज अखरेपर्यंत ३३ हजार २७२ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख ३२ हजार ५३८ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, पोलिसांनी ३ लाख ७७ हजार ५५७ जणांवर कारवाई करत १८ कोटी १५ लाख ६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आतापर्यंत २० हजार २०२ नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ कोटी १४ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, पोलीस विभागामार्फत ४४ हजार २७९ नागरिकांवर कारवाई करत २ कोटी २६ लाख ९१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ग्रामीण भागात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. ग्रामपंचायतीने आतापर्यंत ५७ हजार ९७८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. १ कोटी ८३ लाख ७२ हजारांचा दंड वसूल केला.
पोलिसांनी ८३ हजार ६२९ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ७४ लाख ७६ हजार वसूल केले. तर नगर परिषदांनी ८० हजार १५४ जणांवर कारवाई करत २ कोटी ७८ लाख ८३ हजार ३८५ रुपयांची वसुली केली.
चौकट
२० दिवसांत वसूल केले ५ कोटी आठ लाख
मे महिन्यात १ लाख ४ हजार ८७१ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जवळपास ५ कोटी ८ लाख ४६ हजार ३७५ दंड गेल्या २० दिवसांत प्रशासनाने वसूल केला आहे.