पुणे : धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींचा विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 12:04 PM2022-06-10T12:04:24+5:302022-06-10T12:07:04+5:30
अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन; खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ ...
धायरी: राज्य महिला आयोगाने केलेल्या विधवा प्रथेचे निर्मूलन करण्याच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून खडकवासला मतदारसंघातील धायरीसह २९ ग्रामपंचायतींनी गुरुवारी विधवा प्रथेविरोधात एकाच दिवशी ठराव मंजूर केले आहेत. यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हा पहिला विधवा प्रथामुक्त मतदारसंघ ठरला आहे.
समाजात आजही विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित आहेत. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, जोडवी काढली जाणे यांसारख्या प्रथांचे पालन केले जाते. महाराष्ट्र शासनाने व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व ४ प्रभागातील नागरिकांनी एकाच दिवशी हा ठराव मंजूर केला आहे.
धायरी येथे आयोजित कार्यक्रमात रुपाली चाकणकर, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त विलास कानडे,राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामशिंग गिरासे, तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, प्रशांत जगताप, काका चव्हाण, सुरेश गुजर, राहुल पोकळे, श्रीरंग चव्हाण, रमेश कोंडे, अश्विनी भागवत, दत्ता रायकर, महेश पोकळे, प्रभावती भूमकर, सुप्रिया भूमकर तसेच विविध गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला आयोगाच्या वतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदान चाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. खडकवासला मतदारसंघातून शंभर टक्के विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव होणे कौतुकास्पद आहे.
- रुपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र