दोन वर्षांत २९ हजार रोजगार; पुणे जिल्ह्यात १६ हजार कोटींची गुंतवणूक, ७२ करारांवर स्वाक्षरी
By नितीन चौधरी | Published: March 8, 2024 06:50 PM2024-03-08T18:50:29+5:302024-03-08T18:50:53+5:30
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मराठा चेंबर येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते....
पुणे : उद्योग संचालनालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेत पुणे जिल्ह्यात तब्बल १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यातून सुमारे २९ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. येत्या दोन वर्षांत ही गुंतवणूक होणार आहे.
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मराठा चेंबर येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते. यावेळी ‘एनझेडयूआरआय’ पुणे नॉलेज पार्क प्रायव्हेट लिमिटेड आणि जीव्हीएस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांसह विविध क्षेत्रांमध्ये प्रस्तावित गुंतवणुकीसाठी ७२ गुंतवणूकदार आणि जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्यात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानुसार १६ हजार ५८१ कोटींची गुंतवणूक होणार असून, यामुळे २९ हजार १३ रोजगार निर्माण होणार आहेत.
पुलकुंडवार यांनी उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी आणि या प्रदेशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर दिवसे यांनी जिल्हा विकासासाठी विविध विभागांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी जिल्हा धोरण आराखड्याचे महत्त्व विशद केले. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राजपूत यांनी महाराष्ट्राच्या निर्यातीची परिस्थिती, उद्योगांना नियंत्रित करणारी धोरणे आणि आगामी गुंतवणूक परिषदेविषयी माहिती दिली. त्यांनी राज्याच्या निर्यात, उद्योग आणि आयटी-आयटीईएस धोरणांची रूपरेषा सांगितली.
यावेळी फूड प्रोसेसिंग, डिफेन्स आणि आयटी, आयटीईएस यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये पॅनेल चर्चा झाली. या चर्चेत रोहन उरसळ, हर्ष गुणे, दीनानाथ खोलकर आणि आदित्य परांजपे आदी तज्ज्ञांनी सहभाग घेतला. या क्षेत्रांमधील व्यवसाय धोरणे, तांत्रिक प्रगती आणि आयात प्रतिस्थापन यावर चर्चा झाली. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने यांनी आभार मानले.