मेगाब्लॉकमुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या २९ गाड्या रद्द; 'या' दिवशी रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:27 AM2024-05-28T10:27:19+5:302024-05-28T10:27:56+5:30
डेक्कन क्वीनच्या वर्धापन दिनीच प्रवासी प्रवासापासून वंचित...
पुणे :मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे (दि. १) व (२ ) जूनला डेक्कन क्वीन, प्रगती, इंद्रायणीसह इतर महत्त्वाच्या पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या २९ गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५ गाड्या दादर आणि १० गाड्या पुणे स्थानकातून माघारी जाणार आहेत. यामुळे रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. परिणामी या काळात प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.
डेक्कन क्वीनच्या वर्धापन दिनीच प्रवासी प्रवासापासून वंचित
डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी खास करून नोकरदार वर्ग रोज या गाडीतून अप-डाऊन करीत असतात. या गाडीला १ जून वाढदिवस असतो. यामध्ये प्रवासी एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात; मात्र यंदा वर्धापनदिनीच प्रवासी डेक्कन क्वीनच्या प्रवासाला मुकणार आहेत.
१५ गाड्या दादरपर्यंत धावणार
सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. आता ऐनवेळी रेल्वे रद्द केल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. तसेच या दोन दिवसांत भुवनेश्वर, चेन्नई, बिदर, लातूर एक्स्प्रेससह इतर १५ गाड्या दादर स्थानकापर्यंत धावतील. तसेच परतीचा प्रवास दादर येथूनच करावा लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तर उद्यान, कोयना, नागरकोईल, होसपेट आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या पुणे स्थानकावरच थांबणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत या गाड्या पुण्यातून त्यांच्या निर्धारित वेळेत माघारी जाणार आहेत. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत.