इंदापूरमध्ये हर घर जलसाठी २९४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:26+5:302021-03-13T04:20:26+5:30
इंदापूर: तालुक्यासाठी हर घर जल योजनेतून जल जीवन मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागांतर्गत २४९ कोटी १७ ...
इंदापूर: तालुक्यासाठी हर घर जल योजनेतून जल जीवन मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागांतर्गत २४९ कोटी १७ लाख रुपयांच्या आराखडयास मंजूरी देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील ८५९ वाडया वस्त्यांवरील ९२ हजार ५४९ कुटुंबांना नळ जोडणी मिळणार आहे.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील एकूण १४० गावांना २४७ कोटी १७ लाख रुपयांच्या संपूर्ण प्रारुप आराखडयास मान्यता देण्यात आली असून, या योजनेमधून एकूण १४० गावातील ८५९ वाडया वस्त्यांमध्ये ९२,५४९ कुटुंबांना प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये प्रत्येक घरासाठी नळाव्दारे ५५ लिटर प्रति माणसी प्रतिदिन प्रमाणे शुध्द पिण्याचे व घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. ही योजना २ वर्षामध्ये मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहेत. प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याची जबाबदारी या माध्यमातून पार पडणार असल्यामुळे आगामी काळात कोणतेही कुटुंबाला पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी येणार नाही.
योजनेमुळे इंदापूर तालुका टँकरमुक्त होणार असल्यामुळे, पंचायत समिती स्तरावर कोणताही ताण ग्रामीण भागातील जनतेचा राहणार नाही. मात्र या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांनी जबाबदारीने नळ कनेक्शन कुटुंबाला घेण्यासाठी, संबंधित ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करण्यात यावा, असेही आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
विरोधकांनी दिशाभूल केली तरी त्याला विकासकामांतून आकार देईन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांसाठी मी हजारो कोटींचा निधी खेचून आणत आहे. त्यामुळे विरोधकांची झोप उडाली असून ते तालुक्यातील काहीपण बोलून नागरिक व शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. मात्र मी त्यांच्या आरोपांना विकासकामांच्या माध्यमातून आकार देईन असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.