बारामतीत सावकारांचे धाबे दणाणले; पोलिसांच्या भीतीने ३ कोटींची जमीन शेतकऱ्याला मिळाली परत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 09:27 PM2020-12-18T21:27:44+5:302020-12-18T21:30:14+5:30
सावकारांना वाईट तर सर्वसामान्यांना आता अच्छे दिन आल्याचे मानले जात आहे.
बारामती : बारामती शहरात पोलिसांच्या कडक कारवाईमुळे सावकारांना वाईट दिवस आले असून बडे सावकारांचे धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या सावकाराने पोलिसांच्या भीतीमुळे ३ कोटीची जमीन कर्जदाराला परत केली आहे. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ६० लाख रुपये किंमतीची जमीन सावकाराकडुन पोलिसांनी एका शेतकऱ्याला मिळवुन दिली होती. आजपर्यत ३ कोटी ६० लाखांची बळकावलेली जमीन परत मिळाल्याने शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सावकारांविरुध्द कडक मोहिम उघडली आहे. सावकारांना वाईट तर सर्वसामान्यांना आता अच्छे दिन आल्याचे मानले जात आहे. सावकार हा जळोची परिसरातील आहे. त्याने एका गरीब शेतकऱ्याला १० लाखांचे कर्ज देवुन दरमहा १० टक्के सावकारी व्याजापोटी जवळपास तीन कोटी रुपयांची दिड एकर जमीन लिहुन घेतली होती.
सावकारी व्याजदराने कर्ज घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने महिना लाख रुपये याप्रमाणे अठरा महिने सावकाराच्या पैशाची परतफेड केली.त्यानंतर देखील या पुढारी सावकाराची भुक भागली नाही. तो शेतकऱ्याकडे आणखी पाच लाखांची मागणी करत होता. त्यासाठी त्याला बारामती बाजार समितीतील गाळा आपल्या नावाने लिहून देण्याचा तगादा सावकाराने लावला होता.परिणामी संबंधित शेतकरी घाबरला होता. पैसे दिले न दिल्यास शेतकऱ्याच्या जमिनीवर राजकीय वजन वापरुन आरक्षण टाकण्याची धमकी देखील सावकार देत होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सावकारांविरुध्द केलेले आवाहन सुदैवाने या शेतकऱ्यापर्यंत पोहचले. त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेत आपबिती कथन केली. शिंदे यांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर शेतकऱ्याला मानसिक आधार दिला. तर सावकाराला बोलावणे पाठवले. त्यानंतर घाबरगुंडी उडालेल्या त्या सावकाराला कारवाईचा इशारा देत सरळ केले. त्यामुळे त्याने दीड एकराची संबंधित जमीन त्या शेतकऱ्याला पुन्हा त्याच्या नावे करुन दिली.