''त्या'' तिघांमुळे वाचले कामगारांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:34 PM2019-07-02T14:34:34+5:302019-07-02T14:36:14+5:30
वडगाव बुद्रुक येथे सिंहगड महाविद्यालयाची सिमाभिंत काेसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला. सिंहगड महाविद्यालयाच्या तरुणांमुळे तीन कामगारांना सुखरुप बाहेर काढता आले.
पुणे : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाची सिमाभिंत काेसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री बाराच्या सुमारास घडली. भिंत पडल्याने माेठा आवाज झाला. हा आवाज ऐकून सिंहगड महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणारे तरुण धावत आले आणि भिंतीखाली गाडलेल्या मजुरांना त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या ढिगाऱ्याखालून तिघांना जीवंत बाहेर काढण्यात तरुणांना यश आले. तरुणांनी घटना समजताच तात्काळ पाेलिसांना संपर्क केला. काही वेळातच पाेलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
शनिवारी पुण्यातील काेंढवा भागात अल्कान स्टायलस इमारतीची सिमाभिंत काेसळून 15 मजूरांचा मृत्यू झाला हाेता. या घटनेला दाेन दिवस उलटले नाहीतर तशीच घटना वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. या भागात एका इमारतीचे बांधकाम सुरु हाेते. त्यासाठी सिंहगड महाविद्यालयाच्या सिमाभिंतीजवळ कामगारांचा ट्रॅन्सिस्ट कॅम्प लावण्यात आला हाेता. साेमवारी रात्री पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सिंहगड महाविद्यालयाची सिमाभिंत ट्रॅन्सिस्ट कॅम्पवर काेसळली. त्यात सहा कामगारांचा मृत्यू झाला. रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. भिंत पडल्याचा आवाज येताच सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी गाेविंद महाडिक आणि त्याचे मित्र अमाेल अरसुले, सिध्दार्थ म्हसे, घटनास्थळी धावत आले. रात्रीच्या काळाेखात कामगारांचा आक्राेश ऐकू येत हाेता. महाडिक याने तात्काळ पाेलिसांना घटनेची माहिती दिली. त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने जखमींना ढिगाऱ्याच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली. तिघा जखमींना सुखरुप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. काही वेळातच पाेलीस, अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
महाडिक म्हणाला, रात्री साधारण 11 वाजून 55 मिनिटांनी जाेरदार आवाज झाला. सुरुवातीला वाटले की वीज पडली की काय, वसतीगृहाच्या खाेलीतून खाली पाहीले असता भिंत पडल्याचे दिसले. या भिंतीखाली झाेपड्या दबल्या गेल्या हाेत्या. आम्ही तात्काळ घटनास्थळी पाेहाेचलाे. काेणीच कामगार नजरेस पडत नव्हते. तेथील एक कामगार बाजूला रडताना दिसून आला. तेवढ्यात वाचवा म्हणून काही कामगारांचा आम्हाला आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने जात झाेपड्यांचा मलबा बाजूला करत तिघांना आम्ही सुखरुप बाहेर काढले. त्यानंंतर आम्ही पाेलिसांना घटनेबद्दलची माहिती कळवली. त्यानंतर पाेलीस अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले.