कौतुकास्पद! १२ दिव्यांगांनी ३ तासांत सर केला 'तीन हजार' फूट उंचीचा कोरीगड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 03:22 PM2021-09-29T15:22:46+5:302021-09-29T15:22:57+5:30
शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम : दुर्ग मोहिमेत राज्यातील दिव्यांगांनी घेतला सहभाग
पुणे : राज्यभरातील बारा दिव्यांगांनी एकत्र येत दुर्गम व जंगली असलेल्या कोरीगड किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे. शिवुर्जा प्रतिष्ठान या दिव्यांगांच्या दुर्गभ्रमण व संवर्धन संस्थेतर्फे लोणावळ्याजवळील कोरीगडावर दुर्गभ्रमण व अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचे नेतृत्व दुर्गप्रेमी धर्मेंद्र सातव यांनी केले.
या दुर्ग मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील शिवाजी गाडे, कचरू चांभारे, अंजली प्रधान, जनार्धन पानमंद, केशव भांगरे, जगन्नाथ चौरे, मच्छिंद्र थोरात, जीवन टोपे, कैलास दुरगुडे, रमेश गाडे, वैजनाथ देवाळकर, महेश गोंडे व सुशिला नाईक या दिव्यांगांनी सहभाग घेतला होता. लोणावळ्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या या दुर्गम व बुलंद किल्ल्याला सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष चढाईला सुरुवात केली. एकमेकांना प्रोत्साहन, हाताला हात देऊन आधार देत दिव्यांगांनी कठीण गडवाटेतील अवघड टप्पे सर केले.
तीन तासांत किल्ल्याचा सर्वोच्च माथा सर केल्यानंतर दुर्ग अभ्यासक श्री कचरू चांभारे यांनी कोरीगड किल्ल्याची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती सर्व दुर्गप्रेमींना दिली. किल्ल्यावरील कोराई देवी मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, महादरवाजा, गुहा, पाण्याचे टाके, बुरुजावरील ध्वजस्तंभ, विविध आकाराच्या तोफा व दूरवर पसरलेले विविध फुलांचे ताटवे पाहून सोबत आणलेली भाजी भाकर खाऊन दुर्ग भोजनाचाही आंनद घेतला.
पंधराव्या शतकात पुनर्बांधणी करण्यात आलेल्या या कोरीगडाची उंची ३०५० फूट
लोणावळा डोंगर रांगेत असलेल्या या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे छत्रपती शिवरायांना पुरंदरचा तह करावा लागला त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या ३५ किल्ल्यांपैकी २३ किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले आणि बारा किल्ले स्वतःकडे ठेवून घेतले. त्यात महत्त्वाचा हा कोरिगड किल्ला होता. चौथ्या शतकात निर्मिती झालेल्या आणि पंधराव्या शतकात पुनर्बांधणी करण्यात आलेल्या या कोरीगडाची उंची ३०५० फूट असून सहाशे पायर्यांचा किल्ला म्हणून हा ओळखला जातो.