इंदापूरातील बाभुळगाव परिसरात ३ घरफोड्या, १२ लाखांचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 19:43 IST2025-01-01T19:43:49+5:302025-01-01T19:43:59+5:30
अज्ञात चोरट्याने बाभुळगाव व हिंगणगाव परिसरात घरफोडी करुन १२ लाख २६ हजाराचा ऐवज लुटून ३१ डिसेंबर साजरा केला

इंदापूरातील बाभुळगाव परिसरात ३ घरफोड्या, १२ लाखांचा ऐवज लुटला
इंदापूर: सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत होत असताना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अज्ञात चोरट्याने बाभुळगाव व हिंगणगाव परिसरात घरफोडी करुन १२ लाख २६ हजाराचा ऐवज लुटून ३१ डिसेंबर साजरा केला. तानाजी संभाजी गुरगुडे,कलावती अर्जुन गुरगुडे ( दोघे रा.बाभुळगाव), सुभाष प्रल्हाद देवकर (रा. हिंगणगाव, ता.इंदापूर) या तिघांची घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यांना चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणी तानाजी संभाजी गुरगुडे यांनी तिघांची एकत्रित फिर्याद दिली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री पावणेचारच्या सुमारास अज्ञात चोरट फिर्यादी गुरगुडे यांची घरफोडी केली. वीस हजार रुपयांची रोकड व दागिने असा ४ लाख १६ हजाराचा ऐवज पळवला. त्यानंतर फिर्यादीचे चुलती कलावती गुरगुडे यांच्या घराकडे मोर्चा वळवून ५० हजारांच्या रोख रकमेसह दागिने अशी ६ लाख ९० हजाराची लूट केली. बाभुळगावच्या अलिकडे असणाऱ्या हिंगणगाव मधील सुभाष देवकर यांचे घर फोडून तेथून ही अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपये व दागिने असा १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास केला आहे. हवालदार हेगडे अधिक तपास करत आहेत.