चिमुकलीच्या हृदय प्रत्यारोपण शस्रक्रियेसाठी शरददादा सोनवणेंची 3 लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 03:02 PM2018-01-26T15:02:19+5:302018-01-26T15:02:29+5:30
जुन्नर तालुक्यात आमदार शरद दादा सोनवणे यांना 'आपला माणूस' म्हणून का ओळखतात, याचा प्रत्यय आज पुन्हा जुन्नरच्या जनतेने अनुभवला.
पुणे- जुन्नर तालुक्यात आमदार शरद दादा सोनवणे यांना 'आपला माणूस' म्हणून का ओळखतात, याचा प्रत्यय आज पुन्हा जुन्नरच्या जनतेने अनुभवला. जुन्नर येथील प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीत शिकणा-या रेवती महेंद्र देशपांडे हिच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्रक्रिया करायची आहे, त्यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च आहे.
त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आनंदा कांबळे व रेवतीचे वडील महेंद्र देशपांडे यांनी आमदारांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांची आपुलकीने विचारपूस करून ऑपरेशनपूर्वी भरघोस मदत करू, असा शब्द आमदारांनी दिला होता. त्यानंतर रेवतीची पूर्ण फाईल तयार करून मंत्रालयात सादर केली व त्याचा पाठपुरावा केला आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रेवतीसाठी 3 लाख रुपये मदत मंजूर करून घेतली. त्यामुळे आता लवकरच रेवतीवर उपचार केले जातील.
शाळेचे मुख्याध्यापक आनंदा कांबळे व रेवतीचे वडील महेंद्र देशपांडे यांनी आमदारांचे आभार मानले. त्यावेळी आमदार म्हणाले, जुन्नर तालुक्यातील संकटकाळी जनतेच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे. जुन्नर तालुक्यातील प्रथम नागरिक म्हणून काम करताना फक्त राजकारण न करता सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच आमदार झाल्याचे पुन्हा अधोरेखित केले.