3 अल्पवयीन मुली, दिल्लीहून पुण्यात आल्या, हॉटेलमध्ये रूम मागण्यास गेल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:42 AM2022-08-24T09:42:14+5:302022-08-24T09:42:23+5:30
पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला...
पुणे: मंगळवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान सोमवार पेठेतील नरपत गिरी चौकातील राजधानी हॉटेलमधून पोलिसांना फोन गेला. हा फोन हॉटेलचे मॅनेजर सुधाकर कमलाकर डांगे यांनी केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये तीन अल्पवयीन मुली रूम मागण्यासाठी आलेले असून त्यांच्यासोबत कोणीही वयस्कर व्यक्ती नाही. पोलिसांनी तत्परता दाखवत लगेच हॉटेल गाठले त्यामुळे पुढील अनर्थ टळल आहे.
पोलीस उप निरीक्षक रणदिवे व पथक हे राजधानी हॉटेल या ठिकाणी पोहोचले असता, तेथे तीन अल्पवयीन मुली आढळून आल्या. त्यांना महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने पोलीस ठाण्यास आणण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्या नोकरीच्या शोधामध्ये पुणे येथे काल (मंगळवारी) सायंकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान पुणे स्टेशन येथे दिल्ली ते पुणे असा प्रवास ट्रेनने पोहोचलेले आहेत, असं समजलं. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला होता.
या तिन्ही मुली अठरा वर्षांच्या आतल्या आहेत. सर्वजण नोएडा येथील राहणाऱ्या आहेत. सदर मुलींकडे अधिक चौकशी केली असता, त्या घरामध्ये कोणाला काहीही न सांगता पुण्याला निघून आल्याचे माहिती मिळाली. याबाबत पुणे कंट्रोल रूम येथून दिल्ली पोलीस कंट्रोल रूम यांचा संपर्क क्रमांक प्राप्त करून त्याद्वारे नोएडा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. यामध्ये या मुली हरवल्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, अशी माहिती मिळाली.
या तिन्ही मुलींची ससून रुग्णालय येथे वैद्यकीय व कोविडची तपासणी करून सुरक्षिततेचे कामी बाल सुधारगृह मुंढवा येथे महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने सरकारी वाहनाने पाठवण्यात आलेले आहे. अशी माहिती समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली आहे.