Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:10 AM2023-12-25T10:10:19+5:302023-12-25T10:11:00+5:30
राज्यातील १० रुग्णांना काेराेनाची साैम्य लक्षणे हाेती व ते गृहविलगीकरणात बरे झाले असल्याची माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली
पुणे: सिंधुदुर्गपाठाेपाठ काेराेनाचा उपप्रकार असलेल्या ओमिक्राॅनचा नवीन व्हेरिएंट असलेल्या जेएन १ चे पुणे शहरात दाेन आणि पुणे ग्रामीणमध्ये १ असे तीन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात या रुग्णांची संख्या १० वर गेली असून त्या सर्व रुग्णांना काेराेनाची साैम्य लक्षणे हाेती व ते गृहविलगीकरणात बरे झाले असल्याची माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली.
पुणे शहरातील रुण हा अमेरिकेतून आला हाेता. याआधी सिंधुदुर्गमध्ये ४१ वर्षांच्या पुरुषाला या ‘जेएन-१’ नव्या विषाणूची बाधा झाली हाेती. त्याच्या जिनाेम सिक्वेन्सिंगमधून हा प्रकार समाेर आला. मात्र, आता त्यापाठाेपाठ पुणे शहरात २, पुणे ग्रामीण १, ठाणे मनपात सर्वाधिक ५, अकाेला आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी १ असे एकूण १० रुग्ण झाले आहेत.
या दहा रुग्णांपैकी सिंधुदुर्ग येथील रुग्ण पुरुष वगळता उर्वरित ८ रुग्ण पुरुष तर एक महिला आहे. त्यापैकी एक ९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षांची महिला, २८ वर्षांचा पुरुष व राहिलेले सर्व ४० वर्षांवरील आहेत. यापैकी ८ जणांनी काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेतलेले आहेत, अशी माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली आहे.
दरम्यान, या सर्व रुग्णांना साैम्य लक्षणे हाेती. ती घरीच बरीदेखील झाली आहेत. आता त्यांच्या नमुन्यांचे जिनाेम सिक्वेन्सिंग केले असता हे नवीन पेशंट उघडकीस आले आहेत, अशी माहिती साथराेग विभागाने दिली.