आरटीआय कार्यकर्ते शिरसाट खूनप्रकरणी तिघांना कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 12:56 AM2019-02-17T00:56:18+5:302019-02-17T00:56:39+5:30
भारती विद्यापीठ पोलीस : आरोपींनी कुणाच्या सांगण्यावरून केला खून याचा होणार तपास
पुणे : रिपब्लिकन बांधकाम कामगार सेनेचे उपाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय ३८, रा. शिवणे, मूळ रा. उत्तर प्रदेश), महंमद फारूख इसहका खान (वय २८, रा. उत्तमनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश), मुक्तारअली मसीहुद्दीन अली (वय ३४, रा. आंबेगाव, मूळ रा. मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या तीन जणांची नावे आहेत. विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२, रा. शिवणे) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याबाबत त्यांचे वडील सुधाकर कोंडिबा शिरसाट (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. ३० जानेवारी २०१९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी वर्मा, खान, अली यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता वर्मा हा पीओपीचा व्यवसाय
करतो. पीओपीच्या पैशांच्या देवाण- घेवाणीवरून विनायक आणि वर्मा यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यानंतर विनायक यांनी वर्माला शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरून त्याने इतर दोन साथीदारांसह विनायक यांचे ३० जानेवारी रोजी अपहरण केले. त्या वेळी त्यांना मारहाण केली. आरोपींनी विनायक यांना कोणाच्या सांगण्यावरून मारले आहे का, अपहरण करून त्यांना कोठे नेले, त्यांचा खून कोठे करण्यात आला, त्यांना अन्य कोणी साथीदार आहे का, याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.
विनायक हे ३१ तारखेपासून बेपत्ता होते. ते अनधिकृत बांधकामांविरोधात काम करीत असल्यामुळे कोणीतरी त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुठा गावाजवळ असलेल्या घाटामध्ये सापडला होता. धरमप्रकाश वर्मा व महंमद खान यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुठागावाच्या जवळील घाटात फेकून दिला. या प्रकरणी वर्मा, खान, अली यांना न्यायालयात हजर केले होते.