राज्यात एकसाथ ३ ऋतू; विदर्भात पाऊस, पुण्यात उन्हाचा कडाका अन् सकाळी थंडी
By श्रीकिशन काळे | Published: February 11, 2024 03:05 PM2024-02-11T15:05:24+5:302024-02-11T15:05:36+5:30
अमरावतीसह यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
पुणे : राज्यामध्ये तापमानात वाढ होत असून, त्यामुळे अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. आज रविवारी विदर्भातील अनेक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने शनिवारी दिला होता. पावसाने अमरावती भागात रविवारी धुमाकूळ घातला. गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अमरावतीसह यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत हा पाऊस झाला आहे.
सध्या राज्यामध्ये किमान-कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. दोन्ही तापमानात वाढ होताना दिसत आहे. थंडीचा गारठा कमी झाला असून, उष्णता जाणवत आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. शनिवारी पुण्यात राज्यातील सर्वात कमी किमान तापमान आणि सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले होते. आज देखील सकाळी काही प्रमाणात थंडी जाणवत होती. परंतु, दुपारी मात्र उन्हाचा कडाका चांगलाच जाणवला. पुणेकरांना त्याचा चटका बसत होता.