ललित पाटीलसह चौदा जणांवर ड्रग्ज प्रकरणात ३ हजार १५० पानांचे दोषारोपत्र
By नितीश गोवंडे | Published: March 16, 2024 02:13 PM2024-03-16T14:13:00+5:302024-03-16T14:14:50+5:30
दोषारोपपत्राच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण ठोस पुरावे जप्त केले आहेत...
पुणे : ड्रग तस्करीच्या गुन्ह्यात कारागृहात असताना आजारपणाचे नाटक करून ससून रुग्णालयात राहून ड्रग्ज तस्करीच्या व्यवसायात सक्रिय असणार्या कुख्यात ललित पाटील याच्यासह चौदा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल ३ हजार १५० पानांचे दोषारोपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झाले.
दोषारोपपत्राच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण ठोस पुरावे जप्त केले आहेत. ड्रग्ज प्रकरणात मोक्का लागून दाखल झालेले हे पहिले आरोपपत्र असल्याचे बोलले जात आहे. ड्रग्ज तस्करीतील मास्टर माईंड ललित अनिल पाटील (३७, रा. नाशिक), अरविंद कुमार प्रकाशचंद्र लोहरे (रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी सहा उर्फ सुभाष जानकी मंडल (२९, रा. पुणे), रौफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रोड, पुणे), भूषण अनिल पाटील (३४, रा. नाशिक), अभिषेक विलास बलकवडे (३६, रा. नाशिक), रेहान उर्फ गोलू आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (२६, रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित माहीरे (३९, रा. नाशिक), जिशान इक्बाल शेख (रा. नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (४०, रा. नाशिक ), राहुल पंडित उर्फ रोहित कुमार चौधरी उर्फ अमित कुमार (३०, रा. विरार, मूळ रा. बिहार), समाधान बाबूराव कांबळे (३२, रा. मंठा, जि. जालना), इमरान शेख उर्फ आमिर अतिक खान (३०, रा. धारावी), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (२९, रा. वसई पालघर) यांच्यावर ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दाखल दोषारोपपत्रानुसार, ससूनमध्ये ड्रग्जचे रॅकेट चालवत असताना पुणे पोलिसांनी कारवाई करत २ कोटी १४ लाखांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ललित पळून गेल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. या निमित्त अवैध पद्धतीने सुरू असलेले संपूर्ण ड्रग्ज जगत या कारवाईमुळे ढवळून निघाले. ससून सारख्या रुग्णालयातून अशा पद्धतीने रॅकेट चालवले जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ससून रूग्णालयातील कर्मचारी, कर्तव्यावर असलेले पोलिस, कारागृह पोलिस, कारागृहातील डॉक्टरसह, ससून रूग्णालयातील डॉक्टरचा ललित पाटील याला पळून लावल्याप्रकरणी संबंध आला होता. या प्रकरणात ४ पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते तर सहा जणांना निलंबीत करण्यात आले होते. दरम्यान, ललित पाटीलला पळून गेल्यानंतर कर्नाटक येथून मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर गुन्ह्यातील तपासात मोठे धागेदोरे निष्पन्न झाले होते.
तपास यंत्रणांनी पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी छापे टाकले होते. त्यात नाशिक येथील बंद पडलेल्या कारखान्यात ड्रग्जचे उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. येथून तब्बल ३०० कोटींचे १३३ किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. सुरुवातील मुंबई पोलिसांनी ललितला ताब्यात घेऊन त्याचा तपास केला होता. नंतर त्या पुणे पोलिसांनी ताब्यात घेत दाखल गुन्ह्यासंदर्भात तपास केला. यामध्ये वरील १३ साथीदारांची ड्रग्ज तस्करीतील त्यांचे रोल निष्पन्न झाले. संघटीत टोळी तयार करून हे गैरकृत्य सुरू असल्याने या प्रकरणात मोक्का नुसार कारवाईचा बडगा पुणे पोलिसांनी उगारला. याप्रकरणी पोलिसांकडून १०० हून अधिक साक्षीदारांची यादी आरोपपत्रात जोडण्यात आली आहे. त्याआधारे तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची साखळी योग्य पद्धतीने जोडली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार, तत्कालीन अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या पथकांनी योग्य कामगिरी बजावली. यामध्ये विशेष सरकारी वकील विजय फरगडे काम पाहणार आहेत.