फेरफार अदालतीत एकाच दिवसात ३ हजार २६९ नोंदी निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:47+5:302021-07-30T04:09:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे फेरफार अदालतीचे काम मार्चपासून बंद होते. जिल्हाधिकारी डॉ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे फेरफार अदालतीचे काम मार्चपासून बंद होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार चार महिन्यांनंतर बुधवार (दि.२८) रोजी फेरफार अदालत घेण्यात आली. या फेरफार अदालतीत जिल्ह्यात एका दिवसात ३ हजार २६९ नोंदी निकाली करण्यात आल्या. फेरफार अदालतीमधून नोंदी निर्गतीचे काम आणखी दोन दिवस सुरू राहणार असून, यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
नोंदी निर्गतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर २०२० पासून प्रत्येक मंडळाला संपर्क अधिकारी नेमण्याचे नियोजन करण्यात आले. नोंदी निर्गतीसोबत सातबारा संगणकीकरणामध्ये देखील पुणे जिल्हा प्रगतीपथावर आहे व ऑगस्टअखेर संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पुणे जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०१९ ते ३० जून २०२९ अखेर ३१ लाख १२ हजार ५२५ सातबारा उतारे, १० लाख ३५ हजार ३१६ आठ अ उतारे व ३ लाख २७ हजार ६७८ फेरफार उतारे नागरिकांना ऑनलाईन वितरीत करण्यात आले आहेत. तसेच जानेवारी २०२१ ते जून २०२१ अखेर ८ लाख ७६ हजार ८३२ सातबारा उतारे, ४ लाख ९ हजार २८२ आठ अ उतारे व १ लाख ३२ हजार २५० फेरफार उतारे ऑनलाईन वितरीत करण्यात आले आहेत. त्यापोटी रक्कम २ कोटी ५० लाख ८५ हजार २५५ रुपये इतका महसूल जमा झाला आहे. पुणे जिल्हा राज्यात ७/१२, ८ अ व फेरफार वितरणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
------
तालुकानिहाय फेरफार नोंदी निर्गत
हवेली ३१६, पुणे शहर ५, पिंपरी चिंचवड १४५, शिरूर ४०८, आंबेगाव १६९, जुन्नर १७३, बारामती ४५२, इंदापूर ३१४, मावळ २३८, मुळशी ७१, भोर १०७, वेल्हा १३२, दौंड १९३, पुरंदर १५३, खेड ३९३ अशा एकूण ३ हजार २६९ अशी आहे. फेरफार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण करण्यात आले.
-------
जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये १ लाख ५५ हजार ४३३ फेरफार नोंदी नव्याने घेण्यात आल्या असून, १ लाख ५५ हजार ४२२ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा फेरफार नोंदी धरून घेण्याबाबतीत राज्यात दुस-या क्रमांकावर असून, ९ लाख २३ हजार ९१७ फेरफार नोंदी ोघेतलेल्या आहेत व त्यापैकी ८ लाख ९७ हजार ६६० (नामंजूरसह) फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. फेरफार निर्गतीचे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी महिन्यातून दोनदा फेरफार अदालती घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत, यामुळे नागरिकांच्या फेरफार नोंदी तत्काळ निर्गत करण्यास मदत होणार आहे.
फोटो - फेरफार अदालत
फोटो आेळी - फेरफार अदालतीत नोंद निकाली काढल्यानंतर दाखला देताना खेड प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण.