अबब् ३ हजार गणेशोत्सव मंडळे; ४ लाख घरगुती गणपती, पुण्यातील बाप्पांचा उत्सव 'हजार कोटींचा'

By राजू इनामदार | Published: August 30, 2022 04:12 PM2022-08-30T16:12:05+5:302022-08-30T16:43:13+5:30

विघ्नहराने आणले बाजारपेठेत चैतन्य : मूर्ती ते मांडव आणि पूजा ते विसर्जन माेठी आर्थिक उलाढाल

3 thousand ganpati Mandal 4 Lakh Household Ganapati Pune ganpati Festival Thousand Crores | अबब् ३ हजार गणेशोत्सव मंडळे; ४ लाख घरगुती गणपती, पुण्यातील बाप्पांचा उत्सव 'हजार कोटींचा'

अबब् ३ हजार गणेशोत्सव मंडळे; ४ लाख घरगुती गणपती, पुण्यातील बाप्पांचा उत्सव 'हजार कोटींचा'

Next

पुणे : आपल्या लाडक्या बाप्पाच्या महाउत्सवात काेटींची उलाढाल झाली नाही तरच नवल. काेराेनाच्या दाेन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त साजरा हाेत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात किमान हजार कोटींची उलाढाल होईल, असे जाणकार सांगत आहेत. यात मूर्ती ते मांडव आणि पूजा ते विसर्जन मिरवणूक अशा १० दिवसांच्या खर्चाचा समावेश आहे.

राज्य सरकारने घेतलेला निर्बंधमुक्त उत्सवाचा निर्णय आणि आगामी महापालिकेची निवडणूक विचारात घेऊन ‘होऊ द्या खर्च’ म्हणत इच्छुकांनी घेतलेली उत्सवातील उडी यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य संचारले आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते घरगुती गणेशस्थापना करणाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण यंदाचा उत्सव जल्लाेषात साजरा करण्यासाठी सरसावला आहे.

अबब, किती ही मंडळे

- उत्सव सार्वजनिकपणे साजरा करणाऱ्या मंडळांची पोलिसांकडे असलेली नोंदणीकृत संख्या - ३,५६६
- घरगुती गणेश प्रतिष्ठापना होणाऱ्या कुटुंबाची संख्या- ४,५४,६८६

विविध माध्यमांतून उभा राहणारा पैसा - परिसरातून वर्गणी : अगदी ११ रुपये ते १ लाख १ हजार १११ रुपयांपर्यंत (सार्वजनिक मंडळांचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत)

- साधारण जमा : लहान मंडळाची दरवर्षी किमान १ लाख रुपये, ते मोठ्या मंडळांची कमाल ५० लाख रुपयांपर्यंत
- उत्सव काळात जाहिरातींपासून जमा : कमान- १० ते २५ हजार, रस्त्यांच्या दुतर्फा मंडप- २५ ते ५० हजार, मोठ्या मंडळांना १ लाख ते ५ लाख
- भाविकांकडून दानपेटीत : नवसाला पावणारा किंवा नवस फेडायचा म्हणून- १ हजार रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत

मंडळांना करावाच लागणारा खर्च

- मूर्ती- मंडळाची कायम स्वरूपी पारंपरिक मूर्ती हे पुण्याच्या गणेश उत्सवाचे वैशिष्ट्य. या मूर्तीचे रंगकाम- ५ हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत.
- लहान मंडप : उत्सवाच्या आधी ८ दिवस, उत्सवानंतर ८ दिवस व उत्सवाचे १० दिवस असा साधारण २६ दिवस- २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत.
- मोठा मंडप- सजावट वगैरे सर्व काही- १ लाख रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत.
- देखावा : विद्युत रोषणाई असेल तर १ लाख रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत
- मूर्तींचा हलता देखावा : हा भाडे तत्त्वांवर असतो. दिवसाला ५ ते १० हजार रुपये भाडे असते.
- पूजाविधी : दररोज त्रिकाळ आरती, फुले, हार, प्रसाद

मंडळ प्रसिद्धीसाठीचा खर्च

- देखाव्याच्या उद्घाटनासाठी सेलिब्रेटी : १ लाख रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत. (दोघे असतील तर दुप्पट खर्च)
- ढोलपथकांची सलामी : एक पथकाची सुपारी १० हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत
- प्रतिष्ठापना होताना व विसर्जन मिरवणुकीसाठी पथके घ्यावीच लागतात.
- अन्य खेळ : लेझीम पथक, लाठीकाठी, अशी पथके विसर्जन मिरवणुकीत घ्यावी लागतात. त्यांचे मानधनही द्यावे लागते.
- विसर्जन मिरवणुकीची तयारी : वेगळा रथ असेल तर लहान मंडळांना २५ हजार, मोठ्या मंडळांना २५ हजार ते ५ लाख.

लहान मंडळांचा उत्सवातील एकूण खर्च : किमान १ लाख ते १० लाख
मोठ्या मंडळांचा खर्च : १० लाख ते ५० लाख
प्रतिष्ठित मंडळे : २५ लाख ते १ कोटीपेक्षाही जास्त

कौटुंबिक गणेशासाठीही १ ते १० हजार रुपयांपर्यंतचा खर्च

- घरगुती स्वरूपातील गणेश प्रतिष्ठापना घराच्या रंगरंगोटीपासून सुरू होते. त्या खर्चापासून ते पाचव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी गणेश विसर्जन करेपर्यंत प्रत्येक कुटुंबाचा १ हजार रुपयांपासून ते किमान १० हजार रुपयांपर्यंत खर्च होतोच.
- घरगुती स्वरूपात बसवण्यात येणाऱ्या मखरांचीच किंमत आता २ हजार रुपयांपासून पुढे आहे. कागदी फुलांच्या सजावटीची मोठी मखरे तर ५ ते १५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत व त्याला मागणीही फार मोठी आहे. त्याशिवाय अनेक मोठी कुटुंबे घरातच देखणी सजावट करतात. मुलांची हौस, कुटुंबाची परंपरा अशा काही कारणांनी त्यांच्याकडे खर्चाची मर्यादा नसते.

ढोल पथकांची गुंतवणुकही मोठी

एक ढोल विकत घ्यायचा म्हटले तर किमान ६ हजार रुपये लागतात. त्याचे पान खराब झाले तर त्यासाठी १५०० रुपये द्यावे लागतात. एक ताशा १० ते १५ हजार रुपयांना मिळतो. पथकात अनेक ढोल व ताशेही असतात. एक पथक तयार करायचे तर त्यासाठी किमान २५ ते ५० हजार रुपये खर्च येतो. उत्सवातील साधारण ६ दिवस काम मिळते. किती वेळ वाजवायचे त्यावर पैसे असतात. ५ हजार रुपयापासून ५० हजार रुपयांपर्यंत पैसे मिळतात; पण खर्चही तेवढाच असतो. - पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल पथक महासंघ

मंडपासाठी किमान १० हजार ते लाख रुपये

कोरोनामुळे मोठा फटका बसला होता. सलग २ वर्षे व्यवसाय बंद होता. त्यामुळे यंदा दर थोडेसे वाढवले आहे. बांबू, पत्रे, लाकडी फळ्या १५ ते २० दिवस अडकवून ठेवाव्या लागतात. त्यामुळे किमान १० हजार रुपये तरी एका लहान मंडपाचे होतातच. थोडे कमी जास्त केले जाते. मोठा मंडप व्यावसायिकही यावर्षी किंमत कमी करून देतात. मोठा मंडप असेल तर १ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, असे मंडप व्यावसायिकांनी सांगितले.

गळ्यातील हार, मुकुट अशा दागिन्यांना चांगली मागणी

घरगुती गणेशाला अनेकजण सोन्याचे किंवा चांदीचे दागिने करतात. काही कुटुंबामध्ये दरवर्षी एक दागिना करत असतात. यात केवड्याच्या पानापासून ते गळ्यातील हार, मुकुट असे अनेक प्रकारचे दागिने मिळतात. त्याला चांगली मागणीही आहे. - संजय व सिद्धार्थ वाघ, सराफ व्यावसायिक

Web Title: 3 thousand ganpati Mandal 4 Lakh Household Ganapati Pune ganpati Festival Thousand Crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.