राज्यात हिवतापाचे ३ हजार रुग्ण; डेंग्यूचेही १ हजार ७५५ रुग्ण, एकही मृत्यू नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 01:51 PM2024-06-09T13:51:06+5:302024-06-09T13:51:15+5:30
हिवतापाच्या अवस्थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात
पुणे : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या पावसामुळे कीटकजन्य आणि जलजन्य राेगांमध्ये वाढ हाेते. त्यापैकी मलेरिया किंवा हिवताप हा कीटकजन्य आजार प्रकारात माेडताे. त्यामध्येही पावसाळ्यात वाढ हाेते. महाराष्ट्रात यावर्षी जानेवारी ते ७ मेपर्यंत हिवतापाचे ३ हजार ६२ रुग्ण आढळले असून, अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याच काळात डेंग्यूचेही राज्यात १ हजार ७५५ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे साथराेग विभागाचे सहसंचालक (हिवताप, हत्तीराेग आणि जलजन्य राेग) डाॅ. राधाकिशन पवार यांनी दिली.
हिवताप हा प्लाझमोडीयम प्रजातीच्या एकपेशीय सूक्ष्म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्याने हिवताप होतो. त्याचा प्रसार काही विशिष्ट जातीच्या ॲनाफिलिस या डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलिसच्या सुमारे ५८ जातींपैकी केवळ काही हिवतापाच्या प्रमुख प्रसारक समजल्या जातात. माणसाला हिवतापाची लागण केवळ ॲनाफिलिस डासांच्या मादीपासून होते. हिवतापाच्या प्रसाराला डास घनता, डासांचे आयुष्यमान, राहण्याच्या सवयी, अंडी घालण्याच्या सवयी, कीटकनाशकाला प्रतिकार इत्यादी बाबी कारणीभूत आहेत. डास चावल्यापासून दहा ते पंधरा दिवसानंतर त्याची लक्षणे दिसून येतात. हिवतापात थंड अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम येण्याची अवस्था या तीन अवस्था असतात. या अवस्थानंतर लक्षणेविरहित अवस्था असून, त्यामध्ये रुग्णाला आराम वाटू लागतो, तर त्याचे निदान हे रक्तनमुना घेऊन ताे सूक्ष्म दर्शकाखाली पाहिला जाताे.
थंड अवस्था
या अवस्थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्वरेने वाढत जातो, तीव्र स्वरूपाची डोकेदुखी आणि उलट्या होणे ही सर्वसाधारण लक्षणे दिसतात.
उष्ण अवस्था
या अवस्थेत शरीराचे तापमान खूप वाढते तसेच त्वचेला स्पर्श केल्यास त्वचा गरम व कोरडी भासते. मात्र उलट्या नाहीशा होतात.
घाम येण्याची अवस्था
भरपूर घाम येऊन ताप कमी होतो. तापमान त्वरेने कमी होऊन त्वचा थंड पडते आणि घामेजते.
डेंग्यूचेही १७५५ रुग्ण
राज्यात डेंग्यूचेही जानेवारी ते ७ मेपर्यंत १७५५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्यावर्षी याच कालावधीत १२३७ रुग्ण हाेते. तर गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये १९ हजार २९ रुग्णांची नाेंद झाली हाेती.