पीएमआरडीएला ३ टीएमसी पाणी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:19 PM2018-03-23T13:19:33+5:302018-03-23T13:19:33+5:30
पुणे शहरात सध्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापर होत असून, समान पाणीपुरवठा योजनेनंतर पाण्याची गळती थांबून मोठी बचत होणार असल्याचे स्पष्ट करत ही मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत नव्याने विकसित होणाऱ्या भागासाठी जलसंपदा विभागाने तीन टीएमसी पाणी देण्यास जलसंपदा विभागाने बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी येथे दिली. पुणे शहरात सध्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापर होत असून, समान पाणीपुरवठा योजनेनंतर पाण्याची गळती थांबून मोठी बचत होणार असल्याचे स्पष्ट करत ही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा, पीएमआरडीए आणि पुणे शहराच्या विकासाची सध्य स्थिती व दिशा काय, याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष शैलेश काळे आणि सरचिटणी दिगंबर दराडे उपस्थित होते. या वेळी गित्ते यांनी ही माहिती दिली.
.. पुण्याचे भविष्य उज्ज्वल
पुणे शहरात या शहराची काळजी असणारे अनेक लोक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आहेत. यामुळे पुणे शहराला उज्ज्वल भविष्य असल्याचे मत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी येथे व्यक्त केले. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले मेट्रो, २४ बाय ७ समान पाणीपुरवठा, नदीकाठ सुधार योजना, केबल डक्ट, सायकल योजना अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या विविध प्रकल्पांतर्गत येत्या पाच वर्षांत शहरामध्ये तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहेत. शहरामध्ये गेल्या दहा वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती येत्या पाच वर्षांत पूर्ण होणार आहेत. शहरासोबतच लगतच्या गावांमध्ये कचऱ्याची गंभीर समस्या आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिका आणि पीएमआरडीए यांनी संयुक्त प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे कुणाल कुणार यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन-तीन वर्षांत शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे प्रामुख्याने रिंगरोड, आतंरराष्ट्रीय विमानतळ, पुणे मेट्रो आदी अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत प्रशासक प्रमुख म्हणून सौरभ राव, कुणाल कुमार आणि किरण गित्ते यांनी सविस्तर चर्चा केली.
शहरालगतच्या वाहतूक कोंडीवर संयुक्त तोडगा
सध्या शहरालगतच्या हद्दीत प्रामुख्याने वाघोली, कात्रज, कोंढवा, हडपसर, खडकी या परिसरात होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. परंतु याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीए आणि महापालिकेचा समान्वयातून विविध कामे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. तर पीएमआरडीएच्या वतीने शहरालगत होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सुमारे ११ ते १२ लहान-मोठे प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे गित्ते यांनी स्पष्ट केले.