Accident: मद्यपी वाहन चालकाची ३ दुचाकी, २ चारचाकींना धडक; तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 02:13 PM2021-12-17T14:13:32+5:302021-12-17T14:13:46+5:30
ऊरूळी कांचन येथे महामार्गावर मद्यपी कंटेनर चालकाने तिन दुचाकी व दोन चारचाकी वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.
लोणी काळभोर: ऊरूळी कांचन येथे महामार्गावर मद्यपी कंटेनर चालकाने तिन दुचाकी व दोन चारचाकी वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.
अशोक भिकाजी वैरागे ( वय ३७, रा. माळीमळा, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कंटेनर चालक प्रदीप रामकृष्ण वायरे (वय २४, रा.वर्धा) याला अटक करण्यात आली आहे. अपघातात माउली रविन्द्र झिरोळे, अंकुश बाळू गायकवाड व दिपक सुभाष भालेराव हे जखमी झाले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैरागे हे पिकअप ड्रायव्हर म्हणून काम करतात. गाडी ही ब्लु डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीस करारवर असून ती बारामती ते पुणे व पुणे बारामती अशी घेऊन जात असतात. १५ डिसेंबरला सायंकाळी ५ - ३० वाजण्याच्या सुमारांस ते उरुळी कांचन गावच्या हददीत सोलापुर पुणे महामार्गावर तळवडी चौक येथे पोहचले. तेथे ट्राफिक पोलीस वाहतूक नियोजन करीत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या पाठीमागील बाजूला मोठयाने आवाज झाला. त्यांनी खाली उतरून पाहिल्यावर एका पिकअप गाडीने ठोस तिच्या पाठीमागे इको गाडीला ठोस मारली होती. तसेच त्याक्षणी कंटेनरच्या डाव्या बाजुस तीन दुचाकी पडलेल्या दिसल्या. त्यावेळेस वैरागे यांना समजले की कंटेनरचा मोठा अपघात झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
पोलीस अपघाताच्या ठिकाणी आल्याने जखमीना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले. रोडवरील सर्व गाडया क्रेनच्या साहाय्याने बाजुस करुन रोडवरील वाहतुक सुरळीत केली. पोलीसांनी सदर कंटेनर चालकास ताब्यात घेतले त्यावेळी त्याचे तोंडातुन उग्रवास येत असल्याने त्यास दारु पिलेबाबत विचारले असता त्याने दारुचे सेवन केल्याचे सांगितल्याने पोलीसांनी त्यास वैदयकिय तपासणी करीतां पाठवुन दिले.