पुण्यात दररोज ३५ टक्के पाण्याची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 03:17 AM2020-02-23T03:17:56+5:302020-02-23T03:25:57+5:30
इतर शहरांच्या तुलनेत दुप्पट पाणी वापर; तरी पाणीपट्टी थकली
- श्रीकिशन काळे
पुणे : पुणे महापाालिका सध्या खडकवासला धरण प्रकल्पातून दररोज १३५ कोटी लिटर पाणी उचलत आहे. प्रतिमाणशी ३३७ लिटर पुणेकरांना पाणी मिळते. हे पाणी इतर शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. असे असतानाही येथे पाणीपट्टीचे ५०० कोटी
थकले असून तब्बल ३५ टक्के पाण्याची गळती होत आहे.
शहराची लोकसंख्या साधारण ५० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिका जलसंपदा विभागाकडून १३५० एमएलडी पाणी घेते. महापालिका अधिक पाणी वापरते म्हणून दौंड, हवेली, इंदापूर या तालुक्यांना कमी पाणी पडत असल्याचे जलसंपदा सांगते. त्यामुळे या भागात पाण्यासाठी ओरड होते. पुणेकरांनी पाण्याची उधळपट्टी केल्यास उन्हाळ्यात कमतरता जाणवेल, असा इशारा जलसंपदा विभाग वेळोवेळी देत असते. तरी शहरातील पाणी वापर कमी झालेला दिसत नाही. पुणेकरांना दरदिवशी प्रतिमाणसी ३३७ लिटर पाणी मिळत आहे. इतर शहरांच्या तुलनेत हे पाणी दुप्पट आहे. यावर मीटर हाच पर्याय असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
नवीन जलवाहिन्या टाकणार
शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. या जलवाहिन्या लवकरच बदलण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. पाणपट्टीचे थकलेले ५०० कोटी वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
प्रशासनाने पाणी मोफत दिले पाहिजे; पण, जर कोणी पाण्याचा अपव्यव करीत असेल तर मग त्यावर कडक कारवाई करायला हवी. पाणी जपून वापरावे म्हणून ते महाग केले जाणे हा काही पर्याय नाही. नागरिकांनीही पाणीबचतीवर लक्ष दिले पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.
- उपेद्र धोंडे, जलतज्ज्ञ
२४ तास पाणी हवे, तर होणार अधिक खर्च
2600 कोटी रुपये खर्च शहरात समान पाणीपुरवठा योजना लागू करण्यासाठी होणार आहे.
48 किलोमीटरच्या पाइपलाइन आणि ६७ टाक्या बांधण्याची कामे गेल्या वर्षभरात झाली आहेत. ही योजना पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर शहरात समान पाणीपुरवठा होईल.
अपव्यय टाळण्यासाठी मीटरचा पर्याय
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करणे हा एकमेव पर्याय आहे. जे मोजले जात नाही त्याचे व्यवस्थापन करता येत नाही. एकदा का मीटरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था आणि त्यावर देखरेख करणारी व्यवस्था उभारली की, पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे शक्य होते. त्यातून पाणीबचतीचा प्रचार-प्रसारही करता येतो. पाण्याचा पुरवठा मोजणी करूनच देणे अत्यंत गरजेचे आहे.
- अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा प्रमुख, महापालिका