साैदी अरेबियातून अखेर ३ महिलांची सुटका, रुपाली चाकणकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 10:32 AM2023-09-19T10:32:07+5:302023-09-19T10:32:38+5:30

‘हरवलेल्या महिलांचा तपास लागत नसेल तर आम्हाला कळवा’ असे आवाहन १५ मे २०२३ रोजी राज्य महिला आयोगाद्वारे करण्यात आले होते...

3 women finally freed from Saeed Arabia, information of Rupali Chakankar | साैदी अरेबियातून अखेर ३ महिलांची सुटका, रुपाली चाकणकर यांची माहिती

साैदी अरेबियातून अखेर ३ महिलांची सुटका, रुपाली चाकणकर यांची माहिती

googlenewsNext

पुणे : परदेशात नोकरी लावून देतो असे सांगून फसवणूक केलेल्या पुण्यातील तीन महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘हरवलेल्या महिलांचा तपास लागत नसेल तर आम्हाला कळवा’ असे आवाहन १५ मे २०२३ रोजी राज्य महिला आयोगाद्वारे करण्यात आले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाला ७ जून रोजी मेल आला. यामध्ये महिलेने सौदी अरेबियामध्ये असल्याची माहिती दिली. परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करून सौदी अरेबिया येथे आणून छळ केला जात असल्याची माहिती मिळाली. तीन महिन्यांच्या कारवाईनंतर तीनही महिलांना सुखरूप पुण्यात आणण्यात यश आले आहे. ही कारवाई खडक पोलिस ठाणे आणि पुणेपोलिस आयुक्तालयाच्या मदतीने झाल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्या परिचयातील किंवा घरातली एखादी व्यक्ती हरवली असेल. ४ महिन्यांनंतरही त्या व्यक्तीचा तपास लागत नसेल तर त्याचा पाठपुरावा महिला आयोगाकडे करावा, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाने. २०२३ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत साैदी अरेबिया व ओमानमधून देशभरातील १८ महिला आणि २ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. यात पुण्यातील तीन महिलांचा समावेश आहे. शहरातील १२१ अल्पवयीन मुली व २८५ महिला बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील ९६ मुलींचा आणि २२२ महिलांचा शोध घेण्यात यश आले आहे. तर अद्यापही २५ मुली व ६३ महिला बेपत्ताच आहेत.

महिलांना प्रेमाचे किंवा परदेशात चांगली नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवून परदेशात नेले जाते. तेथे त्यांच्याकडील सगळी कागदपत्रे जमा केली जातात आणि त्यांची फसवणूक केली जाते. मारहाण केली जाते, उपाशी ठेवण्यात येते, त्यांना जबरदस्तीने घरकाम करायला सांगितले जाते.

- पीडिता

नोकरीच्या निमित्ताने महिला पुण्यात येतात. गरजू आणि गरीब महिलांची फसवणूक करून महिलांना ओमान आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्ये नेले जाते. अशा प्रकारे महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार तुमच्या निदर्शनास आले तर त्यांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे. पुणे पोलिसांनी व्हॉट्सॲपद्वारे मदत कक्ष तयार केला आहे. तक्रार करण्यासाठी पुण्यातील शाळा, कॉलेजच्या कॅम्पस व्हॉट्सॲप नंबर देण्यात आला आहे. ८९७५९५३०००/ १०९१/ ११२ या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करता येते.

- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे पोलिस आयुक्तालय

Web Title: 3 women finally freed from Saeed Arabia, information of Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.