चुकीने कीटकनाशक पिलेल्या ३ वर्षीय अरविंदने केली मृत्यूवर मात; डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 22, 2023 04:08 PM2023-06-22T16:08:55+5:302023-06-22T16:09:03+5:30
ससूनमध्ये बालराेग विभागातील डॉक्टरांनी २३ दिवस शर्थीचे उपचार करत त्याचे प्राण वाचवले
पुणे : शेतात खेळत असताना मुळशीतील शेतमजुराच्या तीन वर्षाच्या चिमुकल्याने चुकून कीटकनाशक पिले. त्याच्यावर ससूनमध्ये बालराेग विभागातील डॉक्टरांनी २३ दिवस शर्थीचे उपचार करत त्याचे प्राण वाचवले.
अरविंद जाधव असे त्या चिमुकल्याचा नाव असून ताे मुळशी तालुक्यातील भादस या गावातील रहिवशी आहे. त्याचे वडील राणू आणि आई सीता जाधव हे शेतमजूर आहेत. शेतात काम करताना त्यांचा लहान मुलगा बाजूला खेळत होता. शेतात कीटकनाशकाची पडलेली बाटली त्याने खेळता खेळता तोंडाला लावली. उशिराने ही बाब तेथे असलेल्या राहुल जोरी यांच्या लक्षात आली.
त्याच्या तोंडातून फेस आला व वाफाही येत होत्या. चिमुकल्याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र ताे अत्यवस्थ असल्याने त्याला माेठ्या रुग्णालयात घेउन जाण्याचा सल्ला दिला. बंडू जोरी, माधव जोरी आणि संजय गावडे यांनी धावपळ करत त्याला ससूनला हलवले. ससूनमध्ये बाळावर तातडीने उपचार सुरू केले. ससूनच्या बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालराेग विभागातील डाॅ. शलाका पाटील, डॉ. गोकुळ पावसकर, डाॅ. नरेश सोनकवडे व इतर डाॅक्टरांनी ससून रुग्णालयात मुलांच्या अतिदक्षता विभागात उपचार केले.
कीटकनाशक ठेवताना घ्या काळजी
कीटकनाशक, झुरळ अथवा उंदीर मारण्याची औषधे किंवा शीतपेयाची बाटली ही बहुतेक वेळा खाद्यपदार्थाच्या खोक्यात ठेवले जाते. त्यामुहे ही बाब घातक ठरू शकते. अजाणतेपणाने लहान मुले खाद्यपदार्थ म्हणून त्याचे सेवन करू शकतात. त्यामुळे अशी घातक रसायने अथवा वस्तु दक्षता घेऊन ठेवाव्यात. मुलांच्या हाताला येणार नाहीत अशा पद्धतीने ही रसायने कुलूपबंद ठेवली पाहिजेत.
''अरविंदने ''ऑर्गेनोफॉस्फरस'' या प्रकारच्या कीटकनाशकाचे सेवन केले होते. हे कीटकनाशक अत्यंत घातक असते. त्याला रुग्णालयात आणले तेव्हा तो बेशुद्ध होता. सुरवातीला त्याच्या पोटातील कीटकनाशकाची मात्रा काढली. त्यानंतर त्याच्या छातीतील पाणी नळीद्वारे काढले. त्यासाठी काही दिवस बाळ व्हेंटिलेटरवर होते बाळाने स्वतहून श्वास घेणे सुरू केल्यानंतर व्हेंटिलेटर काढून टाकले. आता ताे सुखरूप आहे.- डॉ. शलाका पाटील, बालराेग विभाग, ससून रुग्णालय''