पुणे : भीक मागण्यासाठी ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण; श्रीगाेंदा येथून महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 08:28 PM2022-05-30T20:28:08+5:302022-05-30T20:29:37+5:30
कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी
पुणे : भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळविण्याच्या आशेने ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला श्रीगोंदा येथे घेऊन जाणाऱ्या महिलेला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक करुन मुलीची सुखरुप सुटका केली. तब्बल ५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
उषा नामदेव चव्हाण (वय ४०, रा. कापसे वस्ती, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, एक २३ वर्षाची महिला फुगे विकत असते. ती २३ मे रोजी दुपारी दीड वाजता ढोले पाटील रोडवरील एका रिक्षात झोपली होती. त्यावेळी तिच्या ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. तिने दोन दिवस तिचा शोध घेतल्यानंतर २५ मे रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सहायक निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तब्बल ५ दिवसांनी श्रीगोंदा येथून उषा चव्हाण हिला पकडण्यात आले.
उषा चव्हाण हिला दोन मुले व दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लग्नात तिने ३० हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यांचे समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. या कारणासाठी ती लहान मुलीला पळवून नेऊन तिला भिक्षा मागण्यासाठी लावणे तसेच तिचे लग्न करताना हुंडा घेता यावा, यासाठी पळवून आणले होते. ही महिला पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त एन. ए. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेता, सहायक निरीक्षक दीपाली भुजबळ, प्रेरणा कुलकर्णी, उपनिरीक्षक अमोल घोडके, सहायक फौजदार दिनेश शिंदे, नामदेव खिलारे, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बालाजी घोडके, संदीप जढर, विशाल गाडे, अझरुद्दीन पठाण, ज्योती राऊत यांनी केली.
१५० सीसीटीव्ही तपासातून मिळाला धागा
ढोले पाटील रोडवरून ज्या ठिकाणाहून या मुलीचे अपहरण केले गेले, तेथे ही महिला दिसली नाही. त्यामुळे पाटील इस्टेट, रेल्वे स्टेशन, मालधक्का, एस टी स्टॅड परिसरातील १५० सीसीटीव्हीमध्ये शोध घेतला. त्यात एका ठिकाणी ती धुसर दिसून आली. या धाग्यावरुन तिला पकडले.