फोटो-व्हिडीओ व्हायरल कराल, तर ३ वर्षांची शिक्षा! प्रायव्हसीचा भंग करणे ठरताे गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:03 AM2024-02-28T11:03:23+5:302024-02-28T11:03:50+5:30
एआरएआय टेकडीवरील बेधुंद मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे...
- नम्रता फडणीस
पुणे : टेकडीवर जोडपी बसली असतील किंवा दारूच्या नशेत मुली पडलेल्या दिसल्या असतील, अशा अनेक घटना नजरेस पडतात. मग परवानगी न घेताच उत्साहाच्या भरात चोरी छुपे मोबाइलवर व्हिडीओ शूट करून त्यांचे चेहरे ब्लर न करताच सोशल मीडियावर व्हिडीओ टाकले जातात. तुम्हीही असे करत असाल तर सावधान! कारण, काेणतीही परवानगी न घेता चित्रण करून प्रायव्हसीचा भंग करणे, हा गुन्हा आहे. संबंधित व्यक्तीला १ ते ३ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. एआरएआय टेकडीवरील बेधुंद मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एखाद्याचा व्हिडीओ किंवा फाेटाे त्याच्या परवानगीशिवाय काढणे आणि व्हायरल करणे, असे प्रकार घडत असतील तर ते व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे कृत्य असेल. हा त्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग आहे. त्यामुळे कुणाच्याही परवानगीशिवाय फोटो किंवा व्हिडीओ काढू नका आणि व्हायरल तर करूच नका, असे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत.
जनजागृती करण्याच्या उद्देशाने एका अभिनेत्याने एआरएआय टेकडीवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलींचा लाईव्ह व्हिडीओ केला आणि तो क्षणात व्हायरलही झाला. त्यानंतर सोशल मीडियातून त्या अभिनेत्यावर टीकेची झोड उठली.
हे अनैतिक नाही का?
सोशल मीडियावर प्रत्येकजण सक्रिय असला तरी हा मीडिया कसा हाताळायचा? हेच अनेकांना कळले नाही. एका चुकीच्या कृतीचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात?, याचे अनेकांना भानही राहिलेले नाही. कोणत्याही व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करताना त्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. मात्र, याबाबत अजूनही समाजात डिजिटल साक्षरता आलेली नाही. दारू पिऊन झिंगत पडण्याला आपण अनैतिक समजत असू तर एखाद्याचे त्याच्या परवानगीशिवाय फोटो किंवा व्हिडीओ काढणेही अनैतिक नाही का? असा सवाल सायबर अभ्यासकांनी उपस्थित केला आहे.
व्हायरल गोष्ट मागे घेणार कशी?
एखादा व्हिडीओ व्हायरल झाल्यास डिजिटल फूट प्रिंट तयार होते. त्यानंतर व्हिडीओ डिलिट केला तरी तो लाखो लोकांपर्यंत पोहोचल्याने अनंत काळ तो व्हिडीओ तिथेच राहणार आहे. त्यामुळे कोणतीही व्हायरल झालेली गोष्ट मागे घेता येत नाही. आणखी काही वर्षांनी तो व्हिडीओ पुन्हा समोर येऊ शकतो. याचे कुणालाच भान राहिलेले नाही. लहान मुले असोत किंवा मोठी माणसे? त्यांचे फोटो, व्हिडीओ काढायचे असल्यास त्यांची परवानगी घेणे आवश्यकच आहे. ही नैतिक मूल्ये पाळलीच गेली पाहिजे.
ही कलमे लागू शकतात :
- ५०९ कलम (भा.दं.वि) :
जो कोणी, कोणत्याही स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या इराद्याने, कोणताही शब्द उच्चारणे, कोणताही आवाज किंवा हावभाव करणे किंवा महिलेच्या गोपनीयतेत घुसखोरी केल्यास, तीन वर्षे साधा कारावास आणि दंड.
- माहिती व तंत्रज्ञान कायदा (कलम ६७) :
एखाद्या महिलेचा अश्लील व्हिडीओ किंवा त्यासंबंधी कंटेंट सोशल मीडिया, अन्य माध्यमांवर प्रसारित केल्यास आरोपीला ३ वर्षांचा कारावास आणि ५ लाखांचा दंड हाेऊ शकताे.
- कलम ६६ ई :
जर कोणी जाणूनबुजून कोणाच्या प्रायव्हसीला धक्का लागेल, असे चित्रण करत असेल किंवा त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या प्रायव्हेट अंगाचे फोटो काढून ते शेअर करत असेल तर आरोपीला ३ वर्षांचा कारावास आणि २ लाखांचा दंड.
अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ काढणार असाल तर आधी पाच हजारवेळा विचार करा. ज्यांचा तुमच्याशी काही संबंध नाही त्यांचा फोटो आणि व्हिडीओ काढणे चुकीचेच आहे. एआरएआय टेकडीवर काढलेल्या व्हिडीओमध्ये एक मोठी चूक हीच झाली की? त्या मुलींचे चेहरे ब्लर केले नाहीत. इथे मूळ मुद्दा हा आहे की, तरुण असो किंवा शाळकरी मुले यांना नशिली द्रव्ये आणि अमली पदार्थ मिळतातच कसे? सरकार आणि पोलिस प्रशासन या यंत्रणा झोपल्या आहेत का? हा खरेतर आजचा चिंतेचा विषय आहे. त्यावर अधिकाधिक बोलले गेले पाहिजे.
-मुक्ता चैतन्य, सायबर अभ्यासक आणि संस्थापिका सायबर मैत्र संस्था
कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय व्हिडीओ व्हायरल करणे, हा त्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग आहे. संविधानाच्या कलम २१ नुसार व्यक्तीची प्रायव्हसी जपणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. भारतीय दंड विधान ३५४ ‘क’नुसार ‘व्हॉयरिझम’अंतर्गत एखाद्याच्या परवानगीशिवाय तिचा फोटो किंवा व्हिडीओ काढल्यास आणि तो व्हायरल केल्यास १ ते ३ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. हे कलम २००३ मध्ये नव्याने समाविष्ट झाले आहे.
-ॲड. गौरव जाचक, सायबर वकील