आंबेडकर चौकासाठी ३० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 01:51 AM2018-12-19T01:51:21+5:302018-12-19T01:51:42+5:30
आयुक्त सौरभ राव : उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटरचा पर्याय उपलब्ध
वारजे : वारजे येथील जुना जकात नाका परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पालिकेत बासनात गुंडाळलेल्या जुन्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता आहे. मनपा आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी केलेल्या पाहणीत तसे संकेत दिले आहेत. या ठिकाणी उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर यापैकी एक व्यवहार्य पर्याय शोधण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केले आहेत.
आयुक्तांनी केलेल्या पाहणी त्यांच्याबरोबरच नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, बाबा धुमाळ, सहायक आयुक्त गणेश सोनुने, बांधकाम अधिकारी अमर शिंदे, सतीश शिंदे, सी. जी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय या भेटीत आयुक्तांनी वारजे उड्डाणपूल भागातील महामार्गाचे प्रलंबित सेवा रस्ते (चर्च ते उड्डाणपूल दोन्ही बाजू), धुमाळ उद्यानातील सोयी सुविधा, शिवण्यातील नवभारत हायस्कूल चौकातील वाहतूककोंडी, संपूर्ण कालवा रस्त्यावरील पाटबंधारेच्या जागेत होणारी अतिक्रमणे काढणे, सह्याद्री शाळेजवळील सार्वजनिक मुतारी व माळवाडी पीएमपी बसथांबा हलविणे, छत्रपती शिवाजी स्टेडियमला निधी देणे, तिरूपतीनगर ते उरीटनगर रस्ता करणे आदीबाबत त्यांनी पाहणी करून अधिकाºयांना तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. सुमारे दोन तास आयुक्तांनी वारज्यात वेळ दिल्याने प्रशासन वेगाने हालल्याचे चित्र दिसले. शिवाय आयुक्तांच्या
भेटीमुळे कधी नव्हे ते वारज्यातील रस्ते स्वच्छ व चकाचक तसेच फ्लेक्समुक्त दिसत होते.
नळस्टॉप चौकातील प्रस्तावीत उड्डाणपुल रद्द करून तो कर्वेनगर- वारजे असा हलवण्यात आला होता. सुमारे दीड किलोमीटर लांबीचा हा पूल झाला असता तर या भागातील वाहतुकीची समस्या बºयाच अंशी कमी झाली असती.
नंतर अधिकाºयांनी या पुलाच्या रचनेत बदल करत तो फक्त कर्वेनगर मुख्य चौकापर्यंतच मर्यादित ठेवला. त्यामुळे निम्माच भागापुरता पूल होऊन यामुळे कर्वेनगर चौकातील वर्दळ सुरळीत झाली असली तरी सात रस्ते एकत्र येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मात्र सकाळ-संध्याकाळ वाहतूककोंडी होतच आहे.
याकडे अधिकाºयांनी लक्ष वेधले असता या ठिकाणी बासनात गुंडाळलेला जुना पुलाचा प्रस्तावावर पुन्हा विचार करून अतिक्रमणे काढून लवकरच पूल किंवा ग्रेड सेप्रेटरचा बाबत अहवाल द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पूल बांधायचा झाल्यास त्यासाठी ३० कोटींची तरतूदही करून देण्याची तयारी त्यांनी दाखवल्याची माहिती नगरसेवक सचिन दोडके यांनी ‘लोकमत’ला दिली.