३० टक्के मधुमेहींना शक्यता मूत्रपिंड समस्येची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:23+5:302021-03-13T04:21:23+5:30
पुणे : मधुमेहाच्या रूग्णांना पुढील आयुष्यात मूत्रपिंडाचा त्रास होण्याची शक्यता असते. मूत्रपिंडाच्या काही समस्या ‘क्रोनिक किडनी डिसीज’ (सीकेडी)ची चिन्हे ...
पुणे : मधुमेहाच्या रूग्णांना पुढील आयुष्यात मूत्रपिंडाचा त्रास होण्याची शक्यता असते. मूत्रपिंडाच्या काही समस्या ‘क्रोनिक किडनी डिसीज’ (सीकेडी)ची चिन्हे दर्शविणारी असू शकतात, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी मूत्रपिंड निरोगी राहण्यासाठी नियमित चाचण्या करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
बहुतांश व्यक्तींना मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असते, मात्र त्यांना त्याबद्दल माहिती नसते. मुत्रात रक्त, मुतखडा, मूत्रपिंडाला तीव्र इजा, वेदना आणि संसर्ग, मूत्रात प्रथिने असणे ही मूत्रपिंडाच्या आजाराची संभाव्य चिन्हे आहेत. इतर लक्षणांमध्ये थकवा, खाज सुटणे, मूत्र उत्पादन कमी होणे, ओटीपोटात वेदना, मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग (यूटीआय), भूक न लागणे, पायांना सूज यासारखी लक्षणे असू शकतात. किडनीच्या समस्या मधुमेहाशी संबंधित आहेत आणि मधुमेहाच्या रूग्णांमध्ये सामान्यत: आढळत असल्याचे पॅथोलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे म्हणाले.
डॉ इंगळे यांनी सांगितले की, मधुमेह झालेल्या जवळजवळ ३० टक्के रुग्णांना मूत्रपिंडाचा त्रास होतो. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर ५-१० वर्षांनी मूत्रपिंडाशी संबंधित समस्या उद्भवतात. मायक्रोआल्बमिन आणि मायक्रोआलबमिन क्रिएटिनिन रेशोचे नियमित निरीक्षण मूत्रपिंड निकामी होण्यापासून बचाव करते. नव्याने निदान झालेल्या मधुमेहाच्या रुग्णांनी या चाचण्या अवश्य केल्या पाहिजेत. ज्येष्ठ रुग्णदेखील ही चाचणी करु शकतात. या चाचण्यांद्वारे मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये लवकर होणारे बदल दिसतात. साखरेची पातळी आणि रक्तदाबावर देखरेख ठेवणे, योग्य वजन राखणे, आहारात मीठाचे सेवन कमी करणे, सकस आहार घेणे, धूम्रपान आणि मद्यपान कमी करणे, दररोज व्यायाम करणे आणि तणावमुक्त राहणे यासारख्या उपायांचा अवलंब केला गेला पाहिजे.