३० जीपीएस पोलीस व्हॅन शहरातील गुन्हेगारीवर ठेवणार ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 04:00 PM2018-08-17T16:00:19+5:302018-08-17T18:49:56+5:30
पुणे शहरात जीपीएस यंत्रणा लावलेल्या ३० वाहनांव्दारे विविध भागात गस्त घालण्यात येणार आहे
पुणे : शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी व्हिझिबल पोलिसिंगवर भर देण्यात येणार आहे. जीपीएस यंत्रणा लावलेल्या ३० वाहनांव्दारे शहरातील विविध भागात गस्त घालण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली.
शहरातील विविध भागात सोनसाखळी, पर्स हिसकावणे, जीवघेणा हल्ला करून नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्त्यावरील गुन्हेगारी (स्ट्रिट क्राईम) कमी करणे तसेच गुन्हेगारावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी ही ३० वाहने शहर पोलीस दलात समाविष्ट झाली असून डॉ़. व्यंकटेशम यांनी त्यांना झेंडा दाखविला़.
तीस वाहनांव्दारे शहरातील विविध भागात गस्त घातली जाणार आहे. या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावली आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातून वॉच ठेवण्यात येईल. दिवसभरात गरजेनुसार सदर वाहने त्यांचे स्थान बदलतील. येत्या १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवून त्याचा काय परिणाम होतो हे पडताळून पाहिले जाणार आहे.
पहाटे तसेच सकाळी प्रभात फेरी मारण्यासाठी नागरिकांची गर्दी असणारी ठिकाणे, त्यानंतर शाळा, कॉलेज परिसर, एफसी रोड, जेएम रोड, कर्वे रोड आदी रस्ते, आयटी पार्क, हिंजवडीच्या दिशेने जाणारे महत्वाचे रस्ते, मार्केटयार्ड, लक्ष्मी रोड आदी बाजारपेठा, तसेच रात्री हॉटेल्स आदी ठिकाणी ही वाहने गरजेनुसार स्थान बदलत राहतील आणि गुन्हेगारांवर वॉच ठेवणार आहे़