बिबट्याच्या हल्ल्यात २० वर्षांत ३० ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:15+5:302021-09-03T04:12:15+5:30
निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि मानव ...
निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी (दि.१) खेड तालुक्यात एका वृद्ध महिलेला ठार मारत हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू तर १०८ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या वारसांना वनविभागाने १ कोटी १६ लाख तर जखमींना १ काेटी ८१ लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटली आहे.
पुणे जिल्हा हा बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बिबटे हे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ तालुक्यात आढळतात. मात्र, इतर तालुक्यातही आज बिबट्या पोहचला आहे. बारामती, दौंड, पुरंदर, इंदापूर तालुक्यातही बिबट्या पोहचला असल्याने मानव आणि बिबट्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याच्या वाढीस अनुकूल परिस्थीती आहे. उसाच्या क्षेत्रात भक्ष्य सोप्या पद्धतीने मिळत असल्याने या उसाच्या क्षेत्रातच बिबट्याची संख्या वाढत आहेत. बिबट्यांची गणना सध्या सुरू असल्याने नेमका आकडा पुढे आला नसला तरी मोठी संख्या बिबट्यांची जिल्ह्यात आहेत. प्रजननास असलेल्या अनुकूल वातावरणामुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जेव्हा ऊसतोडीचा हंगाम येतो तेव्हा प्रकर्षाने मानव बिबट्या संघर्ष जिल्ह्यात पाहायला मिळतो.
वाघाप्रमाणे बिबट्यामध्ये खूप मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची क्षमता नसते. त्याच्या शिकारीच्या कुवतीमधील प्राणी मानवी वस्तीमध्येच सापडतात. यामध्ये कुत्रे, बकरी, डुक्कर, मोकाट गुरे, कमी प्रतिकारक्षमता असलेले प्राणी हे त्याचे खाद्य असते. त्यामुळे बिबट्या वस्तीकडे घुसण्याचे प्रकार वाढले आहे. यातच दाट जंगलाची घटलेली संख्या, तेथे लहान प्राण्यांचे कमी झालेले अस्तित्व आणि जंगलाच्या जवळ सरकलेली वस्ती यामुळे जिल्ह्यात मानव बिबट्या संघर्ष वाढताना दिसत आहे.
गेल्या २० वर्षांत ९ हजार ४५५ पशुधनांवरील हल्ले झाल्याची नोंद जिल्ह्यात आहे. यात ११ हजार १९४ पशुधनांचा मृत्यू झाला. कोंबड्या आणि कुत्र्यांचा मृत्यू झाल्यास त्याची भरपाई वनविभागाकडून मिळत नाही. आतापर्यंत ७ कोटी ५१ लाख ८३ हजार ११२ रुपयांची भरपाई पशुपालकांना वनविभागाने दिली आहे.
चौकट
दक्षता हाच उपाय
पुण्यात बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी वनविभागातर्फे जनजागृती करण्यात येते. शाळा महाविद्यालयात मुलांना बिबट्या दिसल्यास काय करावे काय नाही याची माहिती दिली जाते. गावागावात बेठका घेऊन काय करावे काय नाही याची माहिती दिली जात आहे. मानव बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी सध्या दक्षता हाच एकमेव पर्याय असल्याचे वनविभागाचे आणि प्राणीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चौकट
बिबट्यांची गणना सुरू
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे बिबट्याच्या वाढीस पोषक असे वातावरण आहे. कोंबड्या, जनावरे असे खाद्यही मुबलक असल्याने बिबट्याचे प्रजोत्पादन वाढले आहे. सध्या जिल्ह्यात किती बिबटे आहेत याची गणला वाईल्डलार्फस संस्थेकडून सुरू आहे.
चौकट
कॉलर लावण्याचे काम सुरू
बिबट्याचा जनजीवनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाच्या एका उपक्रमाअंतर्गत बिबट्याच्या मानेवर कॉलर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. १५ बिबट्यांना हे कॉलर लावले जाणार आहे. आतापर्यंत ४ बिबट्यांना हे कॉलर लावण्यात आले आहे. त्यानुसार जीओ टॅगिंगमार्फत त्यांच्यावर नजर ठेवून दिनचर्येचा अभ्यास करण्यात येत आहे
कोट
जिल्ह्यात असलेल्या पोषक वातावरणामुळे बिबट्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. मानव आणि बिबट्यामधील संघर्ष टाळायचा असेल तर दक्षता आवश्यक आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे किंवा समूहाने बाहेर पडावे. वनविभागाने बिबट्या असलेल्या हॉटस्पाॅट ठिकाणांची यादी बनवली आहे. त्या भागात वनकर्मचारी हे कायम गस्त घालत असतात. तसेच त्या ठिकाणी पिंजरा लावून संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-जयरामे गाेडा, उपवनसंरक्षक, जुन्नर विभाग